शिवसेनेच्या कोंदणातील एक हिरा निखळला…!

उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी झांसी जवळील बबिना आणि मऊरानीपूर या मतदार संघात प्रचारफेरीत असताना अचानक फोन आला, ‘भाई कळले का ? आपले सुधीरभाऊ गेले.’ प्रचारातील चेहऱ्यावरचे भावच हरपले. शेजारील कार्यकर्त्याने विचारले ‘क्या हुवा साब? एकदमसे मायुस क्यों हुये.’ ‘हमारे शिवसेनाके नेता सुधीरभाऊ जोशीजी हमे छोड गये… चलिये प्रचार शुरु रख्खे.’ असे म्हणालो आणि मनात मुंबईचे वेध लागले. भर उन्हात तीन साडेतीन वाजेपर्यंत प्रचार संपला आणि गाडीत बसलो ते मुंबईत जसे जमेल तसे वेळेवर पोहोचायचे, यासाठी फोना फोनी सुरु झाली..

मागे वळून पाहिले. एक उंचा पुरा तरुण, जाडजुड मिशा,शर्ट पॅन्ट मध्ये खोउन, थोडीसी केसांची झुलपे उडवत, सुहास्य मुद्रेने समोर चालत आला…. जय महाराष्ट्र ! त्यामुळेच त्यांनी कदाचित पत्नीचे नाव सुहास असे ठेवले असेल.
पाहता पाहता शिवसेनेच्या शिवतीर्थावरील मेळाव्यात सूत्रसंचालन करू लागले. १९७३ साली ते मुंबईचे सर्वात तरुण महापौर झालेआणि सुधीरभाऊंकडे जाण्याचा योग आला.कार्यक्रमाला आले की मस्त रंगत यायची. मुळात रसिक, गाडीत सुद्धा सुंदर मराठी भावगीत, नाट्यगीत, सुगम संगीता बरोबर जुनी हिंदी गाणी. क्रिकेटचे ही तितकेच वेड. पारिजात मधे कधी भेटायला गेलात तर जीन्यावरच संगीताचा मधुर सूर कानी पडत .
असे हे व्यक्तिमत्व.

वंदनीय शिवसेनाप्रमुख मार्मिक मधे ‘वाचा आणि थंड बसा!’ या सदरातून नोकरभरतीत मराठी माणसांवर होणाराअन्याय महाराष्ट्रासमोर मांडत. त्यातून एक वन्ही चेतला आणि शिवसेनेचे निर्मिती झाली. आता मराठी माणसाला न्याय द्यायचा म्हणून १९६८ साली ‘भारतीय कामगार सेने’ची स्थापना झाली. त्यामध्ये आस्थापनातील कामगारांना न्याय मिळू लागला. पण आस्थापनबाहेर पदव्यांची सुरळी घेऊन मराठी तरुण नोकरीसाठी वणवण भटकतोय, त्याची भ्रान्त कशी मिटवायची यासाठी दस्तूरखुद्द वंदनीय शिवसेनाप्रमुख रस्त्यावर उतरले आणि १९७२ साली बँक ऑफ इंडिया वर शिवसेनेचा विराट मोर्चा थडकला, एअर इंडिया च्या चेअरमनच्या श्रीमुखात सणसणीत चढवली आणि मराठी बेरोजगार मुलामुलींसाठी नोकऱ्यांची ही दारे उघडली. शिवसेना आता वाढू लागली आणि इकडे बेरोजगारांचेही तांडे रोज येऊ लागले. यासाठी वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी मग ‘स्थानीय लोकाधिकार समिती महासंघा’ची स्थापना केली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने तिचे हे अवतारकार्य ‘स्थानीय लोकाधिकार’कडे सोपविले. १९७७ साली याची जबाबदारी माननीय सुधीरभाऊंकडे आली आणि या चळवळीला एक झळाळी आली, तेज आले. आणि रिझर्व्ह बँक, अन्य राष्ट्रीयकृत बँका, विमा, तेल, एअर इंडिया या कंपन्या, एम टी एन एल, रेल्वे, पोस्ट, ओ एन जी सी इत्यादी अस्थापनात लोकाधिकार समित्यांची स्थापना होऊ लागली. शिवसेना भवनात बेरोजगारांसाठी लेखी, तोंडी परीक्षासाठी मार्गदर्शन वर्ग सुरु झाले.
सुधीर भाऊंच्या व्यक्तिमत्वामुळे सुशिक्षित तरुण वर्ग शिवसेनेत स्थिरावला, तो शिवसेनामय झाला आणि हां हां म्हणता कडवट शिवसैनिक झाला. कुठल्याही आस्थापनात सुधीर भाऊ गेलें कै व्यवस्थापन शिवसेनेचे हे आगळे वेगळे रूप पाहून अचंबित होत असे त्यामुळे सौहारदाचे वातावरण तयार होत असे. आणि मग आपल्या अस्मितेचे प्रश्न मार्गी लागत.
सुधीरभाऊंच्या नेतृत्वाखाली या वर्गाची सामाजिक कार्याची भूक भागवणारी एक संस्थाच निर्माण झाली. मग सार्वजनिक निवडणुका असोत, की शिबीर, अधिवेशने असोत वा संकटकाळी करावयाचे मदतकार्य असो… लोकाधिकारचे कार्यकर्ते , शिवसैनिक हिरहिरीने भाग घेत असत.
मला आजही आठवते, काही वेळा शिवसेनेवर राजकीय टीका करणारी वर्तमान पत्रेही लोकाधिकारच्या चळवळीचे मात्र तोंड भरून कौतुक करीत असत. लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधव गडकरी किंवा नवाकाळचे संपादक नीलकंठ खाडिलकर अग्रलेख, स्तंभ लेखातून वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी निर्माण केलेल्या या चळवळीचे तोंडभरून कौतुक करत तेंव्हा सुधीरभाऊंच्या पाठीवर साहेबांच्या शाबासकीची थाप पडत असे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळी त्यांच्याकडे आदराने पहात.
जगाच्या पाठीवर स्वतःला नोकरी असून ती धोक्यात घालून आपल्या बेरोजगार भावंडासाठी स्वतःच्या आस्थापना विरोधात संघर्ष करणारी ही एकमेव चळवळ. त्याच चळवळीतून माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडले.
१९९२ साली ते विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते झाले आणि महाराष्ट्रातील रखडलेल्या प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी दौरा केला. त्याच दरम्यान वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आणि आदरणीय उद्धवजींच्या प्रेरणेने माझी जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक झाली होती. त्यामुळे त्यावेळी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यात मी त्यांच्या सोबत होतो. प्रकल्प पाहिला, माहिती घेवून गाडीत बसले की सुधीरभाऊ एक रेकॉर्डर काढत आणि प्रकल्पसंदर्भातील त्यांची प्रतिक्रिया ध्वनीमुद्रित करीत. अशा प्रकारे महाराष्ट्राचा संपूर्ण दौरा झाल्यानंतर त्यांनी यावर एक पुस्तिका काढली ती आजही महाराष्ट्राला मार्गदर्शक ठरू शकते.
प्रवासात मजेशीर किस्से ऐकायला मिळायचे. जळगावमध्ये एका शिवसैनिकाने त्याची पेरूची बाग पाहण्याचा आग्रह धरला. भाऊंच्या शिवसैनिकाला जपण्याच्या स्वभावानुसार मला म्हणाले, ‘अरविंद चला जाऊ या वाटेतच आहे ना’, मग काय…
बाग पाहिली, निघताना त्याने पेरू दिले. गाडी सुरु झाली, भाऊंनी पेरू काढले , मला म्हणाले घे, मी म्हणालो मलाही आवडतो पण त्याच्या बिया दातात अडकतात मी निवांत खाईन. ते म्हणाले थांब तुला मी तुला दाखवतो कसा बियाविना खायचा. त्यांनी तो देठ आणि बूड दोन बोटात चेंडू सारखा धरला आणि गोल फिरवत असा खाल्ला की मधला बियांचा गुच्छ तसाच राहिला. ही छोटीशी शिकवण आजतागायत स्मरणात राहिली.. असे भाऊ…
शिवाई ट्रस्ट मधेही त्यांच्या सोबत काम करण्याचा योग आला. तेथेही त्यांच्या व्यावसायिक अनुभवाचा खूप उपयोग होत असे.
१९९५ साली शिवशाही सरकार आले. सुधीर भाऊ मुख्यमंत्री होणार अशी कुजबुज ऐकू येऊ लागली पण सकाळी माननीय मनोहर जोशींचे नाव नक्की झाल्याची बातमी आली. सुधीर भाऊ शांत, कुठेही त्रागा नाही, चिडचिड नाही. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिलेली जबाबदारी निष्ठेने आणि आनंदाने पार पडणे हेच आपले परम कर्तव्य. वंदनीय शिवसेनाप्रमुखांचा विश्वास हेच त्यांचे भांडवल होते आणि तिच त्यांची संपत्ती होती.
अलीकडच्या काळात सरड्यालाही लाज वाटेल असे रंग आणि पक्ष बदलणारे पाहिले की हा हिरा किती अनमोल होता याची प्रचिती येते. म्हणूनच ते वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे लाडके, विश्वासू आणि पहिल्या फळीतील नेते होते.
एक अपघात झाला आणि भाऊंचे जीवन कार्य अडले. दरवर्षी दिवाळीत मी आणि आमच्या एम टी एन एल लोकाधिकार समितीचे शिवसैनिक अगदी न चुकता त्यांना भेटायचो, आशीर्वाद घ्यायचो. मनमोकळे पणे बोलायचे. मान स्थिरावत न्हवती पण मन आणि भान दोन्हीही शुद्ध आणि शाबूत होती. कोरोना आला आणि दोन वर्षे सगळेच ठप्प झाले पण नाते अखंड राहिले.
आज ते आमच्यात नाहीत पण त्यांच्या पारिजात या निवास स्थानी जाण्यासाठी पाय वळतील तेव्हा पारिजातकाच्या सुगंधापेक्षा तुमच्या प्रेमाचा, निष्ठेचा, त्यागाचा सुगंध कायम दरवळत राहील.
शिवसेनेच्या पहिल्या फळीतील या हिऱ्याला मनस्वी अभिवादन !!
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तिशः मी, माझे कुटुंबीय, एम टी एन एल परिवार सहभागी आहोत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्‍गती देवो ही प्रार्थना.

भावपूर्ण आदरांजली !!

अरविंद सावंत
खासदार