संदेश

जय महाराष्ट्र !

संदेश

जय महाराष्ट्र!
वर्ष २०१४ आणि वर्ष २०१९ मध्ये आपण सर्वांनी दाखविलेल्या विश्वासामुळे, केलेल्या भरभरुन मतदानामुळे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि सौ. रश्मीवहिनी ठाकरे यांच्या आशीर्वादाने, सन्माननीय शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या सहकार्याने, शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, स्थानिय लोकाधिकार समिती, शिवसेनेच्या अंगीकृत संघटना, महानगर टेलिफोन निगम कामगार संघ यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अविश्रांत मेहनतीमुळे व प्रामुख्याने दक्षिण मुंबईमधील मतदारांच्या विश्वासाच्या जोरावर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणुन प्रतिनिधित्व करण्याची, आपली सर्वांची सेवा करण्याची मला संधी मिळाली.
५ जून २०१४ रोजी शपथ घेतली व मराठी आवाज लोकसभेत दुमदुमला कारण शपथ मराठीत आणि शिवसेनाप्रमुखांना वंदन करुन घेतली ! त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. आदरणीय पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे सातत्याने मार्गदर्शन करत, मनोधैर्य वाढवत होते. प्रत्येक जनतेच्या संबंधित विषयावर सरकारला हक्काने सूचना करायला मी कमी पडलो नाही. लोकसभेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषयांपासून जनसामान्यांच्या हिताच्या सर्व विषयांवर बोलणारा मी पहिला खासदार! मग प्रश्न हिंदुस्थान – पाकिस्तान संबंधांचा असो, सीमेवरील जवानांचा असो, देशाच्या सुरक्षेचा असो, कश्मीरचा असो, राममंदीरचा असो, जीएसटीचा असो, उद्योजकांचा असो, गिरणी कामगारांचा असो, माझ्या चाळकर्‍यांचा असो, शेतकर्‍यांचा असो, महिलांचा असो, बेरोजगारांचा असो, विद्यार्थ्यांचा असो, पेन्शन धारकांचा असो, आपल्या राज्याचे, मराठी भाषेचे, मुंबईकरांचे संबंधित विषय मी प्रभावीपणे केंद्रात मांडत राहिलो. माझी लोकसभेतील भाषणे चलचित्रांकीत (व्हिडियो) स्वरुपात ऑनलाइन उपलब्ध आहेत. आपण सारेजण युट्युबवरील माझ्या चॅनलवर माझी भाषणे पाहु शकता. आपण केलेले मतदान सार्थकी लागल्याचा आनंद आपल्याला नक्की मिळेल.
दक्षिण मुंबई मतदारसंघ म्हणजे गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत अशा जनतेचा मतदारसंघ ! या सगळ्यांच्या संदर्भातील जे जे म्हणून प्रश्न केंद्रसरकारशी निगडीत आहेत त्या त्या प्रश्नांवर मी आवाज उठविला, दक्षिण मुंबईकरांसाठी महत्त्वपूर्ण केवळ मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला व हिंदुस्थानला भेडसावणाऱ्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण भाषणांनी लोकसभेत वाचा फोडुन ठसा उमटविता आला, देशपातळीवरील धोरणे, विधेयके, भूमिका यांवर चर्चेत सहभागी होताना सखोल अभ्यासपूर्ण भूमिकेतुन. लोकसभेत चर्चेसाठी येणाऱ्या बाबींवर योग्य त्या मुद्यांना पाठिंबा दर्शवितानाच त्रुटींवर देखील भाष्य केले याचे समाधान आहे. .
हिंदुस्थान – पाकिस्तान समस्या व त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानसोबत सर्व संबंध तोडण्याची मागणी; कश्मीर प्रश्न, कलम ३७० रद्द करुन समान नागरी कायदा अंमलबजावणीची मागणी; तिहेरी तलाक कायदा संदर्भात त्रुटींवर नेमके बोट, कश्मीरमधे देखील लागु करण्याची मागणी; रोहिंग्या रेफ्युजी खुद्द कश्मीरमध्ये वास्तव्य करतात व त्या पार्श्वभूमीवर सीमेवरील सुरक्षा; संविधानातील विविध कलमांच्या अंमलबजावणीसंदर्भात सूचना; भ्रष्टाचार निवारण विधेयकावर सूचना; वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर पॅरीस ॲग्रीमेन्टचे महत्त्व; मुंबईकडुन देण्यात येणाऱ्या करावर आधारित मुंबईसाठी अतिरिक्त विकासनिधीची मागणी; मोफत व अनिवार्य बाल शिक्षण अधिकार संदर्भातील त्रुटी व सुधारणा; मराठा आरक्षण तसेच धनगर व इतर आरक्षणाच्या प्रश्नांवर सुस्पष्ट भूमिका; शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी; शेतकऱ्यांच्या विविध समस्या – न्यूनतम मूल्य निर्धारणीची गरज; महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न; भूमीपुत्रांना रोजगारात प्राधान्य; मराठी भाषेस ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न; रेल्वेच्या पूलांच्या पुनर्बांधणीसंदर्भात सातत्याने मागणी व पाठपुरावा; रेल्वे अपघात व त्यासंदर्भात उपाययोजना, ड्रोन सारख्या सुविधांची मागणी; रेल्वेच्या टाईमटेबलमधील अनियमितता व त्यासंदर्भातील सुधारणा, एलिव्हेटेड ट्रेन्स ची मागणी; रेल्वेस्थानकांवरील सेवा-सुविधा; रेल्वेस्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदलण्यासाठी यशस्वी प्रयत्न; जुन्या मोडकळीस आलेल्या ईमारतींच्या सुरक्षेची समस्या; केंद्र सरकारच्या अखत्यारीतील चाळीच्या पुनर्विकासाची तसेच अशा जागांवर वास्तव्य करणार्‍या रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण; शिक्षणाच्या विविध बोर्डामधील विद्यार्थ्यांसाठी निवडक विषयांसाठी समान अभ्यासक्रमाची मागणी; जीएसटी मुळे विविध व्यापारी क्षेत्रांवर होणारे दुष्परिणाम व व्यापाऱ्यांना करात न्याय्य सवलत; सुवर्णकारांचे प्रश्न, कपडा व्यापाऱ्यांचे प्रश्न, स्थानिक व्यापार्‍यांच्या प्रश्नांचे निराकरण; सर्व शिक्षा अभियानातील त्रुटी; जैतापुर अणुउर्जा प्रकल्पाचे दुष्परिणाम; भूमी अधिग्रहण कायद्याचे दुष्परिणाम व त्रुटी; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आवास योजनेतील सुधारणा; पक्का घर योजनेतील त्रुटीवर नेमके बोट; कर्जत, खोपोली, डहाणू सारख्या दीर्घ पल्ल्याच्या लोकल ट्रेनमध्ये स्त्रीयांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांना शौचालयाची (ई-टॉयलेट्स) सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी; महिला व बाल सुरक्षासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना; किडनी आजाराने त्रस्त रुग्णांना अपंगांकरिता राखीव डब्यातून प्रवास करण्यासाठी परवानगी; जुन्या गड-किल्ल्यांचे संवर्धन, महाराष्ट्रातील मुंबईतील उद्योग / प्रकल्प, व्यापार्‍यांना भेडसावणार्‍या आर्थिक समस्या, जीएसटी आकारणीमुळे व्यापार्‍यांना येणार्‍या अडचणी, शिवडी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची समस्या, रेल्वेच्या जमिनीवर स्थित झोपड्यांचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दर्शनी भागात समोर महाराजांचा पुतळा उभारणी, जगन्नाथ नाना शंकरशेट यांचे नाव रेल्वेस्थानकास देण्याची मागणी, एमटीएनएल / बीएसएनएल पुनर्जीवन, कोस्टल रोड, मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी निधी, क्लस्टर डेव्हलपमेंट, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, चाळकर्‍यांच्या समस्या, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आदि मुंबई आणि महाराष्ट्राशी निगडीत अनेक विषय अभ्यासपूर्ण भाषणाद्वारे मांडून सरकारला दखल घ्यायला भाग पाडले. केवळ एकदाच नाहीतर सातत्याने सभागृहात मांडला आणि संबंधित खात्यांकडे पाठपुरावा देखिल केला. अनेक उपाय सुचवले व काहींची अंमलबजावणी देखील झाली याचा आनंद आहे.
जे. जे. रुग्णालयास अत्याधुनिक कार्डिॲक रुग्णवाहिका, दिव्यांगांना तीन चाकी स्कूटर्स, रेल्वेस्थानकांवर आसनव्यवस्था, मुंबई सेन्ट्रल रेल्वेस्थानकावर २०० बेन्चेस, प्रियदर्शनी पार्क (नेपियन सी रोड) सुशोभीकरण, अनेक मैदाने सुशोभीकरण, आवश्यक ठिकाणी पंप रुम बसवुन दीर्घकाळ प्रलंबित पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आसनव्यवस्था, व्यायामशाळा, ज्येष्ठ नागरिक कट्टा, 24 तास पाणी सुविधा असणारी आधुनिक शौचालये, अनेक रस्त्यांचे डांबरीकरण, समाजमंदीरे, पर्यावरण स्नेही प्लॅस्टिक बॅग्सना पर्यायी अशा पिशव्या वाटप, रुग्णवाहिका वाटप आदी अनेक विकासकामे खासदार निधीतून आणि त्यातुन शक्य नसल्यास वैयक्तिक प्रयत्नांनी प्राप्त निधीद्वारे करण्यात आली. दशकानुदशके प्रलंबित असणाऱ्या अनेक रेल्वे पुलांची पुनर्बांधणी करु शकलो याचा देखील आनंद आहे.
“सत्ता हे आमचे साध्य नाही, ते आमचे साधन आहे जनसेवेचे!” हा वंदनीय शिवसेनाप्रमुखांचा विचार पूर्णपणे अंगिकारला. कोरोना काळात कोरोना विषाणू संक्रमणाच्या आपत्तीत जनतेच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलो. महाराष्ट्रातील नागरिकांसह काश्मीर ते कन्याकुमारी कुठल्याही राज्यातील स्थलांतरितांच्या अन्नधान्याचा प्रश्न स्वत: अहोरात्र लक्ष घालून सोडवला. हजारोंच्या रेशनची, भोजनाची, जीवनावश्यक वस्तुंची व्यवस्था केली. अनेक रुग्णालयांना ओटी किट्स, पोलीस स्थानकांत, वाहतुक पोलीसांकरिता, महानगरपालिका वॉर्ड ऑफिस मध्ये पीपीई कीट, फेस शील्ड्स, हातमोजे व मुखपट्ट्या (मास्क), सॅनिटायजर, शाखांना ऑक्सिजन सिलेंडर्स, विटॅमिनयुक्त फळाच्या रसाचे पॅकेट्स अशा विविध गोष्टींचे हजारोंच्या संख्येने स्वत: भेट देऊन वाटप केले. जातीने लक्ष घालून आपत्ती व्यवस्थापन कक्ष असो, अगदी रेड झोन मार्क केलेला कोविड बाधित भाग असो, पोलीस स्थानके, वादळाच्या शक्यतेमुळे स्थलांतरित असो, रक्तदान शिबिरे असो, आरोग्य सल्ला – चिकित्सा शिबिरे असो… प्रत्येक स्थानी स्वत: उपस्थित राहून लोकांना धीर दिला व अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
निवडणुकीत दिलेले प्रत्येक आश्वासन व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. विविध केंद्रीय समित्यांमध्ये केवळ हजेरी न लावता प्रत्येक प्रश्नावर परखड मत मांडले आहे, योग्य त्या सूचना केल्या आहेत व त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला आहे. आपत्तीप्रसंगी दक्षिण मुंबईकरांचा हक्काचा ‘आपला माणूस’ म्हणून धीर द्यायला स्वत: जातीने हजर राहुन शिवसेनेच्या समाजसेवेचा वसा जपला!
शिवसेना राजकीय पक्ष असला तरी ८० टक्के समाजकारणावर आमचा भर आहे व त्यानुसार सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे. आज देशात होणारी संविधानाची पायमल्ली, लोकशाहीचे अवमुल्यन आणि सत्तेचा गैरवापर आपण सर्वजण पदोपदी अनुभवतो. मुंबई आणि महाराष्ट्राची गळचेपी, भूमीपुत्रांच्या हक्कांवर अतिक्रमण असह्य झाले आहे. या बेबंदशाहीस वेळीच वेसण घातली नाही तर कदाचित भविष्यात लोकप्रतिनिधी निवडण्याचा मुलभूत अधिकार देखील गमावण्याचा धोका नाकारता येत नाही. मतदारांनी कोणत्याही भ्रमजालात न अडकता, कुठल्याही जुमलेबाजांच्या आहारी न जाता सुज्ञपणे आणि जबाबदारीने मतदानाचा अधिकार किंबहुना कर्तव्य पालन करणे ही या घडीची या देशाची आपल्या मातृभूमीची, महाराष्ट्राची आणि मुंबईची नितांत गरज आहे. आणि हे कर्तव्य आपण निष्ठापूर्वक पार पाडण्यासाठी ‘मशाल’समोरील बटन दाबून मला विक्रमी मतांनी निवडुन द्याल हा मला ठाम विश्वास आहे.
मुंबईचे आर्थिक राजधानी हे स्थान टिकविण्यासाठी, महाराष्ट्राच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी, लोकशाहीच्या अस्तित्वासाठी, भ्रष्टाचारमुक्त, सुनियोजित विकासासाठी कटीबद्ध, सामान्य जनतेसोबत बांधिलकी जपण्यासाठी, दक्षिण मुंबईचा आवाज दिल्लीत पुन:श्च बुलंद करण्यासाठी आपले आशीर्वाद असेच राहु द्या, मतपेटीतुन भरभरभरुन ते फलीत होऊ द्या, ही प्रार्थना !