शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेच्या
स्थापनेपासूनच दोन प्रमुख विचार दिले, एक म्हणजे “८० टक्के समाजकारण – २० टक्के राजकारण, जनसेवेचे व्रत हाच ध्यास”; आणि दुसरा विचार म्हणजे “जातीपातीच्या भिंती पाडण्यासाठी ब्राम्हण-ब्राम्हणेतर, मराठा-मराठेतर, शहाण्णवकुळी/ब्याण्णवकुळी, घाटी-कोकणी, स्पृश्य-अस्पृश्य हे जातीभेद गाडून, महाराष्ट्रासाठी मराठी म्हणून एक होण्याचा मंत्र.” अरविंद सावंत याच सुत्रांवर वाटचाल करत गत अनेक दशके मराठी माणसासाठी, हिंदुस्थानातील हिंदूसाठी अविरत कार्यरत आहेत.
शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासूनच अरविंद सावंत आघाडीचे शिलेदार होते. शिवसेना पक्ष बांधणीमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी केली. वक्तृत्व, मुत्सद्देगिरी व समाजकारण यांचा त्रिवेणी संगम म्हणजे अरविंद सावंत. अरविंद सावंत यांच्यातील त्यांच्या निकटवर्तीयांना देखील अचंबित करणारा गुण म्हणजे अथक, अविश्रांत काम करण्याचा झपाटा… अरविंद सावंत म्हणजे हिंदुत्वाच्या विचाराने झपाटलेला शिवसेनाप्रमुखांच्या ‘बाळ’कडूचा अविष्कार, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
अरविंद सावंत यांचा जन्म तळकोकणातला पण, त्यानंतरच उभं आयुष्य मुंबईतल्या गिरणगावात. सात भावंडातला थोरला. त्यामुळे सुरुवातीस लाड आणि नंतर आपसूकच येणाऱ्या जबाबदाऱ्या. घरची परिस्थिती तशी जुजबी. दहा बाय दहाची गिरणगावातील खोली, प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण गिरणगावातीलच परळ येथील शिरोडकर हायस्कुलमध्ये. कॉलेजमध्ये जाण्यासाठी फी भरण्यासाठी पैसे नसताना आईने मंगळसूत्र गहाण ठेवून फी भरण्यासाठी पैसे दिले. तिथेच एक संस्कार घडला, त्यागाचा ! स्वतःच्या हौस-मौजे पेक्षा मुलांचे शिक्षण मोठं असा विचार करुन त्या माऊलीने हा त्याग केला. तिची तर असंख्य त्यागाची उदाहरणे त्यांच्या समोर तरळताना दिसत होती.
याच काळात महाराष्ट्राच्या निर्मितीचा लढा, तो काळ दूरदर्शन, मोबाईल, सामाजिक माध्यमांचा नसल्यामुळे रेडिओ, तोही चाळीच्या मजल्यावरील एखाद्या कुटुंबाच्या घरी असे, आणि त्यावेळची ‘मराठा’, ‘नवशक्ती’ ही वर्तमानपत्रे माहितीची स्रोत होती, त्यामुळे त्यांचे वाचन, १९६२, ६७ ची युद्धे हे सर्व शालेय जीवनात अनुभवलेले आणि आईने दिलेला त्यागाचा धडा आणि राज्य आणि राष्ट्र यांची अंतर्यामी ओळख झाली आणि संस्कारही झाले.
याच काळात १९ जून १९६६ रोजी शिवसेना स्थापन झाली. वंदनीय शिवसेनाप्रमुख या तरुणाच्या जीवनात आले आणि सारे आयुष्यच पालटून गेले. समाजकारणाचा, अन्याया विरुद्ध लढण्याचा, मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणूस यांच्या उद्धाराचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, गोर गरीबांना, अडल्या नडल्याना मदत करण्याचा एक मूलभूत संस्कार घडला. आई वडिलांनी ते बीज रोवले होते त्याला वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या वाणी, लेखणी आणि कुंचल्याने घुमारे फुटले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
१९६८ साली गटप्रमुख म्हणून राजकारणातील प्रवासाची सुरुवात करुन २०१४ पासून मुंबईचे प्रतिनिधित्व देशपातळीवर यशस्वीपणे करतानाच २०१९ मध्ये थेट संयुक्त राष्ट्र महासभा म्हणजेच ‘युनो’त आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करुन अरविंद सावंत यांनी प्रत्येक शिवसैनिकास व प्रत्येक दक्षिण मुंबईतील रहिवाशांसच काय तर सर्व भारतीयांना अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे!
समाजकारणाचा वसाच घेऊन हा माणूस उभा राहिला, आणि त्याचबरोबर सामाजिक न्यायाच्या लढ्यातही उभा राहिला. १९६९ च्या सीमा आंदोलनात बेळगावात जाऊन ते आंदोलनात सहभागी झाले. बेळगाव – कारवार – धारवाड – निपाणी – भालकीसह कर्नाटकातील मराठी भाषिक भूभागासाठी शिवसेनेने ६९ हुतात्मे दिले. नायगाव येथील त्रिकोणी मैदानात (आताचे डॉ. एन. ए. पुरंदरे मैदान) जहाल भाषणाद्वारे शिवसेनाप्रमुखांनी मराठी अस्मिता जागृत केली. त्या आंदोलनात खाल्लेला पोलीसांचा मार अरविंद सावंत यांना अधिक कडवट बनवत गेला.
आंदोलने, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीरे, क्रीडा स्पर्धा, चष्मा शिबीर, आरोग्य शिबीर हे शिवसेनेचे उपक्रम म्हणजे अरविंद सावंत यांचा दिनक्रम होऊन बसला. मराठी माणसाला नोकरभरतीत प्राधान्य मिळत नाही म्हणून शिवसेनाप्रमुखांनी लढा उभारला होता. पण नोकऱ्या न मिळण्याचे मूळ कारण होते त्याकाळी मराठी मुले स्टेनो, टायपिंग आणि मूळ म्हणजे इंग्रजी, गणितात कच्चे. शिवसेनाप्रमुखांसोबत तेव्हा प्रिं. वामनराव महाडिक होते. ते त्या गिरणगावात शिवसेनेचे नेतृत्व करीत. त्यांच्या जीभेवर सरस्वती होती. त्यांचे क्लासेस चालायचे, शिवडीलाही त्यांचे क्लासेस होते. त्या क्लासेस मध्ये हा माणूस महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्राथमिक शाळेतील गोरगरीबांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित हे विषय शिकवत होता. शिवसेनेचे हे महत्कार्य प्रिं. वामनराव महाडिक मोफत क्लासेसद्वारे शिवडी येथे गोरगरिबांच्या कल्याणासाठी चालवीत होते. तेथे हे ही विद्यार्थ्यांना विनामुल्य शिक्षण देणारे शिक्षक ! असा हा समाजकारणी वसा !!
एकदा मोखाड्यातील अंगणवाड्यांना भेटण्याचा योग आला असता तिथे लाकडे जाळून घरातील अन्न शिजवीत होते. ती जागा पूर्ण धुराने भरली होती आणि आदिवासींची मुले तेथे खेळत होती. अरविंद सावंतांनी विचारले ‘गॅस का नाही वापरत?’ अंगणवाडी सेविका म्हणाली, ‘सरकार देत नाही.’ झाले, अरविंद सावंत म्हणाले, ‘मी देतो’, आणि त्यांनी मोखाड्यातील ११० अंगणवाड्यांना गॅस आणि शेगड्या दिले, तेही त्याकाळी गॅस व शेगड्या मिळणे दुरापास्त असताना ! आज ‘उजाला’ योजनेचा गवगवा होत आहे. अरविंद सावंतांनी ते काम २० वर्षांपूर्वी वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवशी केले. याला तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. निर्मल देशमुख हे साक्ष आहेत. ते त्यावेळी म्हणाले “मी अनेक राजकारणी पहिले. घोषणा करतात आणि विसरुन जातात. पण अरविंद सावंत, हे पहिले राजकारणी पहिले, अनुभवले की त्यांनी शब्द दिला आणि तो पूर्ण केला. आणि तेथेच अरविंद सावंतांची ख्याती झाली, दिल्या शब्दाला जागणारा जनतेचा ‘आपला माणूस’ !
क्रिकेटचे प्रचंड वेड, अन्य खेळांचीही आवड, संगीत, नाट्याभिनयाची आवड, मराठी वाडमयात रुची असे नाना गुण अंगी असलेल्या अरविंद सावंत यांनी कलाप्रांतात काम केले, मराठी वाडमय मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम केले. शिवडी मध्यविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षपद काही काळ भुषाविले. संस्कृतीप्रधान देखावा, आयोजन व मिरवणुकीची दखल त्याकाळी बीबीसीने देखील घेतली.
दरम्यान १९६६ साली ते तत्कालीन बॉम्बे टेलिफोन मध्ये नोकरीस लागले. १९७७ साली जनता दलाच्या लाटेत भले भले शिवसेना सोडून गेले पण अरविंद सावंत शिवसेनेत ठाम राहिले. कनिष्ठ अभियंता पदासाठी विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अरविंद सावंत यांना एका वर्षासाठी मद्रास येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठविले गेले. तिथे त्यांना अनुभव आले की मद्रासमधील लोक खूपच ‘प्रादेशिक’ आहेत आणि इंग्रजीचा थोडासा भाग वगळता हिंदी किंवा अन्य कोणत्याही भाषेत उत्तर देण्यास तयार नाहीत. प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांचीही मानसिकता हीच होती. वसतिगृहात टीव्ही होता. ते दूरदर्शनचे दिवस होते, प्रादेशिक भाषेतील बातम्या रात्री ८.०० वाजता, राष्ट्रीय भाषा हिंदीमध्ये ९.०० वाजता आणि इंग्रजी १०.०० वाजता प्रसारित होत असत. तामिळनाडूमध्ये हिंदी न्यूजवर निर्बंध होते, राज्य सरकारने हिंदी बातमीला अधिकृतपणे परवानगी नाकारली. वसतिगृहातील वॉर्डन ९.०० वाजता टीव्ही बंद करत असत. देशातील, महाराष्ट्रातील बातम्या, घडामोडी समजण्यासाठी मराठी मुले कासावीस होत आणि तो त्यांचा हक्क देखील होता. अरविंद सावंत यांना शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांच्या संस्कारांनी गप्प बसू दिले नाही. शिवसेनाप्रमुख यांनी कधीही कोणत्याही भाषेचा किंवा लोकांचा द्वेष केला नाही. म्हणूनच समजत असलेल्या भाषेत बातम्या न ऐकता टीव्ही बंद करण्याच्या या निर्णयाविरूद्ध अरविंद सावंत यांनी बंड केले. वसतिगृहाच्या व्यवस्थापनाने स्पोर्ट्स रूम रात्री १०.३० पर्यंत खुली ठेवण्यास सहमती दर्शविली. संपूर्ण प्रशिक्षणार्थी व इतर राज्यांतील प्रशिक्षणार्थींनी अरविंद सावंत यांचे अभिनंदन केले. या निषेधामुळे प्रशिक्षणार्थींनी त्यांना क्रीडा समितीचे सचिव म्हणून निवडले. भोजन ही आणखी एक सर्वांना भेडसावणारी समस्या होती. दिवसभर ते सांबार, इडली, भात, ताक असे दाक्षिणात्य खाद्यपदार्थच उपलब्ध असतं. परंतु आवाज उठवुन पोळ्या देण्यास त्यांनी भाग पाडले. प्रशिक्षणात नेहमीच प्रथम राहुनही निषेध केल्यामुळे, अनुशासनाचे कारण देऊन त्यांचे गुण कमी केले गेले. परंतु, ह्या सर्व प्रत्यक्ष अनुभवांतुन तावुन सलाखुन ते जेंव्हा महाराष्ट्रात परत आले ते अधिकच कट्टर व कडवट होऊन !
नोकरीतही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी महानगर टेलिफोन निगम मध्ये स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना करुन ते थांबले नाहीत तर न्यायासाठी झगडत राहिले. १९८६ मध्ये एमटीएनएलने पेपरमधील जाहिरातींद्वारे ३५० कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनियर) पदासाठी भरती मोहीम जाहीर केली. या सर्व पदांसाठी उमेदवार निवडले गेले. आश्चर्य म्हणजे या यादीत एकाही भूमीपुत्राची निवड झाली नव्हती. निवड झालेल्या यादीत दाक्षिणात्य उमेदवारांची अधिक संख्या पाहुन अभ्यासू अरविंद सावंत यांनी जरा अधिक तपास केला तेंव्हा धक्कादायक तथ्य प्राप्त झाली.
मद्रास विद्यापीठ आणि दक्षिणच्या काही इतर विद्यापीठांमध्ये जर आपण पदवीची कोणतीही परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि परीक्षेत इच्छित गुण किंवा वर्ग प्राप्त केला नसेल तर आपणास सुधारण्यासाठी तीच परीक्षा पुन्हा देण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जात होती, त्यामुळे स्वाभाविकच त्यांना अधिक गुण प्राप्त होत असत. परंतु अशी संधी न मिळणाऱ्या इतर उमेदवारांवर हे अन्याय करणारे होते. शिवाय, ते रोजगार विनिमय कायद्याचे उल्लंघन होते. या पळवाटेचा गैरफायदा अन्य प्रांतातील लोक घेऊन भूमिपुत्रांच्या हक्काच्या नौकऱ्यांवर ते डल्ला मारत होते. आणि आपले मराठी विद्यार्थी (त्यापैकी मुठभरच बी. एस्सी. परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त करणारे किंवा अभियंते असायचे) बहुतेक वेळेस गुणवत्तेच्या शेवटी होते. अरविंद सावंत यांनी या त्रुटीवर बोट ठेवले पण व्यवस्थापन त्या उमेदवारांच्या विद्यापीठ पुन्हा परिक्षेस बसून मिळविलेल्या गुणानुसार निवड करण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. यावर अरविंद सावंत यांनी शिवसैनिकाचा रुद्रावतार दाखवला आणि तीव्र आंदोलन छेडले. भूमीपुत्रांसाठी त्यांनी निषेधार्थ प्रभादेवी येथील तत्कालीन व्हीव्हीआयपी रोड समजला जाणारा वीर सावरकर मार्ग रोखुन धरला. विशेष म्हणजे, ते त्यावेळी नोकरीत होते, हे त्यांनी स्वत:साठी नाही तर भूमीपुत्रांना न्याय मिळवुन देण्यासाठी केले, स्वत:च्या नोकरीची पर्वा न करता ! पोलीसांनी घेरले, अटक झाली, परंतु न डगमगता त्यांनी आंदोलन तडीस नेले. आणि अरविंद सावंत यांनी एका तऱ्हेने इतिहास घडवला, सर्व ३५० पदांवर मराठी भूमीपुत्रांची निवड झाली. संघर्ष करुन १००% मराठी माणसांची भरती करून घेतली.
लोकसत्ताचे संपादक श्री. माधव गडकरी यांनी “चौफेर” सदरात, तर नवाकाळकर ‘अग्रलेखाचा बादशहा’ श्री. नीलकंठ खाडिलकरांनी अग्रलेख लिहून अरविंद सावंतांचे तोंड भरून कौतुक केले. एकदा विद्यमान मुखमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे एका मेळाव्याला संबोधित करताना अरविंद सावंत यांच्याबद्दल म्हणाले “हा माणूस असा आहे की शिवसेनाप्रमुखांच्या कडवट विचारातून, त्या मुशीतून निर्माण झालेला, तयार झालेला, हा अतिशय जिद्दी आणि निष्ठावान मावळा आहे. आणि त्याचे वैशिष्ट्य हेच आहे की त्याला कोणताही विभाग द्या, कोणताही म्हणजे अगदी खडकाळ विभाग जरी दिला तरी तेथे जाऊन शिवसेनेच्या विचारांची बीजे पेरुन ते उगवून येईल.” ह्या गौरवोद्गारातच या माणसाचे समर्पण सिद्ध होते.
याचवेळी त्यांनी महानगर टेलिफोन निगम मध्ये वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या आणि विद्यमान मुख्यमंत्री नामदार श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने महानगर टेलिफोन निगम कामगार संघाची स्थापना केली. तेथेही कामगारांचे जीवनमान बदलल्याशिवाय राहणार नाही असा कर्मचार्यांना शब्द दिला आणि न भुतो न भविष्यती असे ऐतिहासिक वेतन करार करुन लाखो कामगारांचेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन कायमस्वरुपी सुखी करून, दिल्या शब्दाचे पालन केले. आजपर्यंतचा देशातील हा कदाचित सर्वात यशस्वी, सर्वसमावेशक, आस्थापन व कामगार दोहोंच्याही हिताचा सुवर्णमध्य साधणारा करार आहे. आज महानगर टेलिफोन निगमचा एकही कर्मचारी सापडणार नाही ज्याचे स्वतःच्या मालकीचे घर नाही. अगदी तृतीय / चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची देखील घरकुल उभारण्यासह मुलांना महागडे उच्चशिक्षण देण्यापर्यंतची सर्व स्वप्ने साकार झाली. तब्बल १२ वर्षे सातत्याने झगडून निगमच्या कर्मचार्यांना केंद्र सरकारच्या तिजोरीतून निवृत्ती वेतन मिळण्याच्या ऐतिहासिक करारामुळे कर्मचार्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित झाला. ६०,००० कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचे भले झाले. १९९० साली दूरसंचार खात्यातील संपूर्ण देशातील कॅज्युअल लेबर्सना कायम स्वरुपी सेवेत घेण्यास भाग पाडले, त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचे भले झाले, त्यांचे जीवन सुरक्षित झाले. कुटुंबप्रमुखाप्रमाणे मटेनिल च्या कर्मचाऱ्यांचीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांची देखील त्यांनी कायम काळजी केली व कौतुकही केले. शालांत परिक्षेत प्रावीण्य दाखविणार्या विद्यार्थ्यांसाठी गत २५ वर्षे सातत्याने कौतुक सोहळा आयोजित करतानाच त्यांना समाजातील विविध धुरीणांमार्फत मार्गदर्शन देखील उपलब्ध करून दिले.
महानगर टेलिफोन निगम लि. मुंबई कर्मचारी सहकारी पतपेढीचे ५ वर्षे अध्यक्ष आणि आता मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत. पतपेढीची रु. २५० कोटीपर्यंत उलाढाल होत असून पगारदार सहकारी पतपेढ्यामध्ये आज ही सर्वोत्कृष्ट पतपेढी म्हणून गणली जाते.
एस. टी. कर्मचाऱ्यांचा वेतन व सवलतीचा अभूतपूर्व ऐतिहासिक करार अरविंद सावंत यांच्याच कारकीर्दीत संपन्न झाला. रु. ७२ कोटींची वाढ पहिल्या वर्षात देण्यात आली व पुढे ती रु. ३०० कोटींपर्यंत झाली.
याच कालावधीत मुंबई – ठाणे सह इतर प्रांतात शिवसेना रुजत होतीच, पक्षाचा विस्तारदेखील होत होता. १९८५ साली संभाजीनगर येथे निवडणूक शिवसेनेने लढवली. शिवसेना नेते श्री. सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली अरविंद सावंत यांनी सातत्याने संभाजीनगर येथील रणरणत्या उन्हांत प्रचारकार्यात स्वत:ला जुंपुन घेतले होते. प्रखर उन्हाने त्यांच्या नाकातुन रक्त येत असे परंतु ह्या तक्रारी जणु काह त्यांना जाणवतही नसत… आत्तासारखी मोबाईल फोनस्वरुपी दळणवळणाची सोयीची साधने तेंव्हा उपलब्ध नव्हती. ट्रंक कॉलच्या सहाय्याने रात्रभर बसुन शिवसेनाप्रमुखांना सर्व घडामोडी कळवुन, त्यांच्या आशीर्वादरुपी मार्गदर्शनानुसार पूढील प्रचार अशा स्वरुपात अहोरात्र कार्य करुन संभाजीनगरमध्ये शिवसेनेची बांधणी अधिकाधिक त्यांनी मजबुत केली.
दरम्यानच्या काळात शिवसेनाप्रमुखांनी अरविंद सावंत यांना एस. टी. कामगार सेनेची जबाबदारी देताच एस. टी. कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या समजून घेण्यासाठी एस. टी. च्या लाल गाडीतून उभा महाराष्ट्र पालथा घातला.
१९८७ ते १९९२ सोलापूर, १९९२ साली जळगावची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली. १९९४ साली अवघ्या उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली गेली. तेंव्हा तिथे शिवसेनेचा एकही आमदार नव्हता. अरविंद सावंतांनी खेडोपाडी जावुन काम केले. तेथील भाषेचा ढंग, केळी – कापूस आदी पिकांसंदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या, वातावरण सगळंच नवीन होतं त्यांच्यासाठी. व्यापक कॅनव्हास मिळाला आणि त्यांनी स्वत:च्या मेहनतीने तो विजयश्रीने रंगवला. उल्लेखनीय बाब म्हणजे सहा जागा शिवसेनेने, सहा जागा भाजपने लढविण्याचा निर्णय झाला आणि शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने, उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाने व सोबत कार्यरत सहकाऱ्यांच्या अजोड मेहनतीच्या जोरावर शिवसेनेस प्रथम निवडणूकीत सहा पैकी चार तर त्यापूढील निवडणूकीत पाच जागांवर विजयश्री प्राप्त झाली. धुळे येथे शिवसेनेचा आमदार, जळगाव, नाशिक पालिकांमधील विजय… यशाची अशीच शिखरे शिवसेना पादाक्रांत करीत होती. या काळांत विद्यमान मुख्यमंत्री श्री. उद्धवसाहेब पक्षकार्यात अधिक सक्रिय झाले होते. ते स्वत: बारकाईने अरविंद सावंत यांच्या कार्याचे परिक्षण करीत, मोलाचे मार्गदर्शन करीत व त्यांना शाबासकी देत.
नोकरी करत अरविंद सावंत संघटनेचे कार्य करीत होते. टेलीकॉम क्षेत्रात क्रांती होत होती. एमटीएनएलचा कारभार व्यापक होत होता. परंतु कर्मचारी दुर्लक्षित होते. १९८८ साली स्थानीय लोकाधिकार समितीने पूढाकार घेऊन युनियनची स्थापना केली. एक वर्ष १५० कार्यालयांना भेट देऊन अरविंद सावंत स्थानीय लोकाधिकार समितीची माहिती देत होते. युनियन स्थापन करण्याचा निर्णय झाल्यावर त्यांनी पुन:श्च १५० द्वारसभा घेतल्या. अन्य युनियन्ससोबत बोलणी करुन त्यांना “महानगर टेलिफोन निगम कामगार संघ” च्या छत्राखाली एकत्र आणले. युनियन मान्यताप्राप्त करून घेतली. दरम्यान दिल्ली येथे देखील एक युनियन सक्रिय होती. त्या युनियनसोबत १९८९ साली ‘टोकन स्ट्राईक’ केला व त्यास यश प्राप्त झाले. सरकारने १०० रु. तात्पुरती ‘ऑन द स्पॉट’ वेतनात वाढ जाहीर करून अन्य मागण्यांचा सकारात्मक विचार सुरू केला.
१९९४ ला नाशिक येथे शिवसेनेचे अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला आणि आदरणीय उद्धवसाहेबांनी ह्या अधिवेशनाची संपूर्ण तयारी करण्याची जबाबदारी सोपवली अरविंद सावंत यांच्यासह महानगर टेलिफोन निगम कामगार संघावर… सर्वांनी दिवस-रात्र मेहनत केली, नियोजनबद्ध आखणीमुळे व सर्वांच्या साथीने हे अधिवेशन ऐतिहासिक ठरले. १९९५ साली निवडणुकीत भगवा फडकला, या विजयश्रीसाठी अरविंद सावंत यांनी अपार मेहनत घेतली.
त्यानंतर या माणसाकडे शिवसेनाप्रमुखांचे लक्ष गेले नाही, असे कसे होईल ? साहेबांनी त्यांच्यावर अनेक जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या. ज्या जिल्ह्यात गेले तेथे संघटना मजबूत केली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तेथेही आदिवासी, गोरगरिबांच्या कल्याणाचा ध्यास व त्यासाठी काम. मग नाशिकमधील पेठ, सुरगाणा असो, नंदुरबारमधील तोरणमाळ असो वा पालघर जिल्ह्यातील मोखाडा असो. या माणसाने या गोरगरिबांना कपडे, धान्य, त्यांच्या सोबत दिवाळी, आरोग्य शिबीर हे उपक्रम कोणत्याही राजकीय लाभाचा विचार न करता केले.
शिवसेनाप्रमुखांचे सर्व बाबींकडे बारकाईने लक्ष होते. त्यांचे हे सर्व कार्य पाहून वंदनीय शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय नामदार श्री. उद्धवजी ठाकरे यांनी १९९६ साली त्यांना विधान परिषदेत आमदार केले आणि त्यांच्या कार्याला अधिक घुमारे फुटले.
सिंधुदुर्ग जिल्हा, कणकवली तालुक्यातील कुंभवडे हे त्यांचे मूळ गाव, ते आमदार झाल्यामुळे गावातील लोकांनी आग्रह धरला की गावातील माध्यमिक शाळेची जबाबदारी घ्यावी. मुळात शिक्षकी पिंड आणि समाजकारणी, त्यामुळे त्यांनीही जबाबदारी स्वीकारली. सोबत संस्थेचे सरचिटणीस पत्रकार शशी सावंत यांना घेऊन कार्य सुरु केले. कुंभवडे हे तसे दुर्गम गाव. सिंधुदुर्गातील पण कोल्हापूरच्या सीमेवरचे. त्यावेळी गावची लोकसंख्याही बऱ्यापैकी होती. त्यामुळे गावातील मुलांना गावातच माध्यमिक शाळा उभारुन त्यांच्या शिक्षणाची सोय करावी आणि त्यांची पायपीट थांबवावी यासाठी शंकर महादेव सावंत नावाच्या पुण्यात्म्याने गावकऱ्यांच्या सहकार्याने, १९८४ साली शंकर महादेव विद्यालय सुरु केले आणि १९९७ साली अरविंद सावंत या शाळेचे अध्यक्ष झाले. सुरुवातीस शालांत परीक्षांचा निकाल ७०-७५ टक्के लागत होता. तो अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाने आणि शिक्षकांच्या सहभागाने २००३ साली शाळेचा १००% पर्यंत उंचावला आणि मग शाळेनेही मागे पाहिले नाही. २००३ सालापासून आजतागायत शाळेचा शालांत परीक्षेत १००% निकाल लागत आहे. घार हिंडते आकाशी, परी लक्ष पिलापाशी या म्हणीप्रमाणे या शाळेकडे अरविंद सावंतांचे लक्ष आहे आणि त्याचीच परिणती म्हणजे हे निकालातील सातत्य! केवळ पाठ्यपूस्तकांमध्ये विद्यार्थ्यांना प्रावीण्य मिळवुन नाही दिले तर या शाळेत त्यांनी मुलांना घोडेस्वारी, नेमबाजी अशा विविध विद्यांचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले. उल्लेखनीय म्हणजे, ह्या शाळेत सर्पालय आहे. शाळेतील मुले, मुली सहज सापाला, अजगराला हाताळताना पाहून अचंबा वाटतो. स्पर्धा युगात विद्यार्थ्यांना आवश्यक असे मल्टिस्किल फाउंडेशन कोर्स, इंट्रोडक्शन ऑफ बेसिक टेक्नॉलॉजी असे कोर्सेसही घेतले जातात. शाळेत प्रयोगशाळा, सुसज्ज वाचनालय, कॉम्प्युटर लॅब आहेत. या सर्व उपक्रमांमुळे अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान घेऊन विद्यार्थी प्रगल्भ होतो. या शाळेचे ‘गुरुकुल’ नावाचे वसतिगृह आहे. आज या वसतिगृहात मुलामुलींना प्रवेश दिला जातो. सर्वात महत्वाचे म्हणजे या शाळेत मुंबई, कणकवली, देवगड पासून विद्यार्थी तर आहेतच परंतु नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा तालुक्यातील आदिवासींची मुले वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत आणि त्या २५ आदिवासी मुलांच्या खर्चाची जबाबदारी अरविंद सावंत यांनी घेतली आहे !
शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीवर नेतानाच कुंभवडे गाव तसेच पंचक्रोशीतील गावकर्यांना अनेक वर्षे भेडसावणारा पाण्याचा गहन प्रश्न त्यांनी सातत्याने सर्व स्तरांवर पाठपुरावा करून मार्गस्थ केला.धरण बांधण्यास प्रशासकीय मंजुरी व आर्थिक तरतुद ती देखील तब्बल रु. ३५ कोटींपेक्षा अधिक करुन त्यांनी केवळ ग्रामस्थच नाही तर समस्त कोकणातील जनतेसोबत देखील बांधिलकी राखली. २० वर्षांहुन अधिक काळ ठाणे जिल्ह्यातील आदिवासींसोबत अरविंद सावंत दिवाळी साजरी करतात. मोखाडा तालुक्यातील ४५० कुपोषित बालकांना दत्तक घेऊन ती सुदृढ होईपर्यंत आरोग्य सेवा, औषधे, पौष्टीक आहार दिला.
“सत्ता हे आमचे साध्य नाही, ते आमचे साधन आहे जनसेवेचे!” हा वंदनीय शिवसेनाप्रमुखांचा विचार त्यांनी आयुष्यात पूर्णपणे अंगिकारला. राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी करणार्या अरविंद सावंत यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे वक्तृत्व! विधानपरिषदेतील पहिल्याच भाषणाला विधिमंडळातील ‘राष्ट्रकुल संसदीय मंडळा’च्या वतीने देण्यात येणार्या ‘उत्कृष्ट भाषणाचा’ पुरस्कार व तत्कालीन राज्यपाल श्री. पी. सी अलेक्झांडर यांच्याकडून विशेष गौरव झाला. भाईंच्या या वक्तृत्वशैलीस दस्तुरखुद्द वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी ‘तू हाताळलेल्या विषयांचा पल्ला खूप मोठा आहे. विचारांची खोली जाणवते. देश, महाराष्ट्र, मुंबई, मराठी भाषा या शिवसेनेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर बोलताना तुझी रसवंती विशेष खुललेली दिसते.’अशी अविस्मरणीय दाद दिली. यातच त्यांच्या अंगीभूत गुणांचा सापेक्ष अविष्कार पहायला मिळतो. अभ्यासपूर्ण भाषण, मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषांवरील प्रभुत्व व धारदार आवाजातील, संवाद साधल्याप्रमाणे भासणारी, परंतु मुद्देसूद भाषणशैली यांचा सुयोग्य मिलाफ म्हणजे अरविंद सावंत यांचे वक्तृत्व!
एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी ते संसदेत उभे राहतात तेव्हा सत्ताधारी पक्षासह विरोधकदेखील त्यांचे भाषण, त्यांचे मुद्दे शांतपणे ऐकतात हेच त्यांचे वेगळेपण.
केवळ आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला व हिंदुस्थानला भेडसावणाऱ्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण भाषणांनी लोकसभेत वाचा फोडून अरविंद सावंत यांनी आपला ठसा उमटविला आहे.
दहशतवाद पसरवण्यासाठी पैसा पुरविल्याप्रकरणी वादग्रस्त धर्मप्रसारक डॉ. झाकिर नाईक वर बंदी घालण्याची निडर मागणी देशात अरविंद सावंत यांनी सर्वप्रथम केली. लोकसभेत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ चा नारा देऊन त्यांनी संसद दणाणून सोडली.
अरविंद सावंत यांची नियोजनबद्धता व सखोल अभ्यासपूर्ण जाण चर्चेत त्यांनी मांडलेल्या भूमिकेतुन झळकते. लोकसभेत चर्चेसाठी येणाऱ्या बाबींवर योग्य त्या मुद्यांना पाठिंबा दर्शवितानाच ते नेमक्या त्रुटींवर बोट ठेवतात आणि त्यांची महत्त्वपूर्ण सूचना सदर बिल, कायदा, अध्यादेश बनविणारे मंत्री व यंत्रणा देखील सकारात्मकरित्या विचारात घेतात.
देशपातळीवरील धोरणे, विधेयके, भूमिका यांवर त्यांनी जनतेवर होणाऱ्या परिणामांचा सखोल विचार करुन अभ्यासपूर्ण सूचना केल्या आहेत.
मुंबई दक्षिणचे खासदार श्री. अरविंद सावंत यांनी लोकसभेत उपस्थित केलेले व विविध खात्यांच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा केलेले महत्त्वपूर्ण विषय व मागण्यांवर दृष्टीक्षेप:
हिंदुस्थान – पाकिस्तान समस्या व त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानसोबत सर्व संबंध तोडण्याची मागणी; कश्मीर प्रश्न, कलम ३७० रद्द करुन समान नागरी कायदा अंमलबजावणीची मागणी; तिहेरी तलाक कायदा संदर्भात त्रुटींवर नेमके बोट, कश्मीरमधे देखील लागु करण्याची मागणी; रोहिंग्या रेफ्युजी खुद्द कश्मीरमध्ये वास्तव्य करतात व त्या पार्श्वभूमीवर सीमेवरील सुरक्षा; संविधानातील विविध कलमांच्या अंमलबजावणीसंदर्भात सूचना; भ्रष्टाचार निवारण विधेयकावर सूचना; वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर पॅरीस ॲग्रीमेन्टचे महत्त्व; मुंबईकडुन देण्यात येणाऱ्या करावर आधारित मुंबईसाठी अतिरिक्त विकासनिधीची मागणी; मोफत व अनिवार्य बाल शिक्षण अधिकार संदर्भातील त्रुटी व सुधारणा; मराठा आरक्षण तसेच धनगर व इतर आरक्षणाच्या प्रश्नांवर सुस्पष्ट भूमिका; शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी; शेतकऱ्यांच्या विविध समस्या – न्यूनतम मूल्य निर्धारणीची गरज; महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न; भूमीपुत्रांना रोजगारात प्राधान्य; मराठी भाषेस ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न; रेल्वेच्या पूलांच्या पुनर्बांधणीसंदर्भात सातत्याने मागणी व पाठपुरावा; रेल्वे अपघात व त्यासंदर्भात उपाययोजना, ड्रोन सारख्या सुविधांची मागणी; रेल्वेच्या टाईमटेबलमधील अनियमितता व त्यासंदर्भातील सुधारणा, एलिव्हेटेड ट्रेन्स ची मागणी; रेल्वेस्थानकांवरील सेवा-सुविधा; रेल्वेस्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदलण्यासाठी यशस्वी प्रयत्न; जुन्या मोडकळीस आलेल्या ईमारतींच्या सुरक्षेची समस्या; केंद्र सरकारच्या अखत्यारीतील चाळीच्या पुनर्विकासाची तसेच अशा जागांवर वास्तव्य करणार्या रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण; शिक्षणाच्या विविध बोर्डामधील विद्यार्थ्यांसाठी निवडक विषयांसाठी समान अभ्यासक्रमाची मागणी; जीएसटी मुळे विविध व्यापारी क्षेत्रांवर होणारे दुष्परिणाम व व्यापाऱ्यांना करात न्याय्य सवलत; सुवर्णकारांचे प्रश्न, कपडा व्यापाऱ्यांचे प्रश्न, स्थानिक व्यापार्यांच्या प्रश्नांचे निराकरण; सर्व शिक्षा अभियानातील त्रुटी; जैतापुर अणुउर्जा प्रकल्पाचे दुष्परिणाम; भूमी अधिग्रहण कायद्याचे दुष्परिणाम व त्रुटी; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आवास योजनेतील सुधारणा; पक्का घर योजनेतील त्रुटीवर नेमके बोट; कर्जत, खोपोली, डहाणू सारख्या दीर्घ पल्ल्याच्या लोकल ट्रेनमध्ये स्त्रीयांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांना शौचालयाची (ई-टॉयलेट्स) सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी; महिला व बाल सुरक्षासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना; किडनी आजाराने त्रस्त रुग्णांना अपंगांकरिता राखीव डब्यातून प्रवास करण्यासाठी परवानगी; जुन्या गड-किल्ल्यांचे संवर्धन इ. अनेक विषय अभ्यासपूर्ण भाषणाद्वारे मांडून अरविंद सावंत यांनी सरकारला दखल घ्यायला भाग पाडले. ही सर्व भाषणे त्यांच्या यु-ट्युब चॅनलवर उपलब्ध आहेत.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संसदीय स्थायी समिती; केंद्रीय अंदाज समिती; सल्लागार समिती – दळण वळण व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय या विविध महत्त्वपूर्ण केंद्रीय समित्यांवर सदस्यपद भूषविताना देशपातळीवरील अनेक धोरणांमध्ये अरविंद सावंत यांनी अनेक बहुमोल सूचना केल्या.
खासदारकीच्या काळात अरविद सावंत यांनी केलेले एक अजून उल्लेखनीय कार्य म्हणजे दक्षिण मुंबईमधील रेल्वेस्थानकांवर बांधले गेलेले अनेक पूल! अनेक दशके प्रलंबित असणार्या अनेक रेल्वे पुलांची पुनर्बांधणी अरविंद सावंत यांनी अनेक स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करून पूर्ण करुन घेतली. मुंबई सेन्ट्रल रेल्वेस्थानकावर २०० बेन्चेस स्वत:च्या निधीतून देऊन त्यांनी प्रवाशांना आसनव्यवस्था उपलब्ध करून दिली. रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांना होणाऱ्या समस्येत व्यक्तिश: लक्ष घालून त्यांनी चर्चगेट – विरार ट्रेन्सना गर्दीच्या वेळेस सर्व स्थानकांवर थांबा मिळवून दिला.
खासदाराचे प्रमुख कर्तव्य, मतदारसंघातील तसेच देशातील जनतेच्या समस्या, प्रश्न लोकसभेत मांडून त्यांची उकल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे! यात अव्वल असणारे भाई स्थानिक खासदार निधीतून दक्षिण मुंबईतील जनतेच्या आवश्यकतांनुसार विकासकामे साकारण्यासाठी देखील तेवढेच सजग आहेत. नेमक्या गरजांचा अंदाज घेऊन ते निधी विनियोग करतात.
प्रशासकीय बाबींना त्यांनी विकासकामांमध्ये कधीही अडथळा ठरु दिले नाही. सँडहर्स्ट रोडला लागून असलेली संरक्षक भिंत कोसळली तेंव्हा रेल्वेच्या अधिकार्यांनी भिंतीलगतच्या इमारती खाली न केल्यास ही संरक्षक भिंत बांधता येणार नाही अशी आडमुठी भूमिका घेतली होती परंतु खासदार अरविंद सावंत यांनी पालकमंत्री श्री. सुभाष देसाई यांना परिस्थिती कथन केली. व्यक्तिश: पाठपुरावा करून सुभाष देसाई यांच्या मदतीने जिल्हा नियोजन विकास महामंडळ निधीतून (District Planning Development Corporation (DPDC) funds) रु. दीड कोटीचा निधी वितरित करुन घेतला नागरिकांना दिलासा दिला.
भारतात प्रथमच खासदार निधीतून जे. जे. रुग्णालयास अर्पण करण्यात आलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व सुविधायुक्त जीवनरक्षक रुग्णवाहिका त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात तर ‘प्रियदर्शनी पार्कचे सुशोभिकरण व शिशुउद्यान’ भाईंच्या कल्पकतेचे प्रतीक! दक्षिण मुंबईतील सुशोभीत उद्याने, अनेक खुली सभागृहे, दुरुस्ती केलेल्या पाईपलाइन्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी आसनव्यवस्था (बेन्चेस), पाण्याच्या टाक्या, संरक्षक भिंती (प्रोटेक्शन वॉल्स), रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प, फुटपाथ, सार्वजनिक शौचालये, विविध शाळांमध्ये संगणक प्रशिक्षणाची सोय इत्यादी जागोजागी साकारली गेलेली लोकोपयोगी विकासकामे अरविंद सावंतांची सामाजिक बांधिलकी दर्शवितात.
कुठे भिंत कोसळल्यामुळे झालेला अपघात, आगीसारख्या दुर्घटना, पूर, अतिवृष्टी, दुष्काळ अशी कुठलीही आपत्ती जनतेवर ओढवली की अगदी अर्ध्या रात्री देखील स्थळ-काळाचे बंधन न बाळगता धावून जाणे हा त्यांचा विशेष स्थायी भाव. नुसती भेट न देता आवश्यक औषधे, प्रशासकीय यंत्रणांसोबत समन्व्यय, आरोग्य शिबिरे, अन्नधान्य – कपडे – जीवनावश्यक वस्तू वाटप करुन समयोचित मदतीचा हात दिला. मग ते दक्षिण मुंबईतील दुर्घटनाग्रस्त असोत वा सांगली / कोल्हापूर येथील मराठमोळी कुटुंब वा गुहागर – वेंगुर्ले येथील फयानग्रस्त पिडीत मुसलमान कुटुंबे, अरविंद सावंत तत्परतेने मदतीसाठी हजर होते सर्व आवश्यक कुमक घेऊन आणि सर्वात महत्त्वाचे धीर द्यायला स्वत: जातीने ! काही ठिकाणी जेथे पोहोचण्याचे मार्ग खुंटले तिथे अगदी छोट्या बोटीला घेऊन परिणामांची तमा न बाळगता लोकांना धीर देणार्या ह्या लोकप्रतिनिधीने खरंच युवा पिढीसमोर एक आदर्श उभा केला आहे. काळाची गरज ओळखून प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीकरिता केवळ जनजागृती करून ते थांबले नाहीत तर तब्बल दोन लाख दर्जेदार कापडी पिशव्या मतदारसंघात वाटल्या, दिव्यांगांना सार्वजनिक वाहतूक साधनांनी प्रवासात येणार्या अडचणी ओळखून अनेकांना तीन चाकी बाईक्स उपलब्ध करून दिल्या.
सलग दुसर्या वेळेस दक्षिण मुंबई सारख्या अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठित मतदारसंघात लक्षणीय मताधिक्याने जिंकुन आलेल्या अरविंद सावंत यांना द्वितीय विजयश्रीनंतर शिवसेना पक्षप्रमुख – विद्यमान मुख्यमंत्री श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी केंद्रीय मंत्रीपदावर विराजमान केले. केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री म्हणून आपल्या छोट्या कालखंडातदेखील अरविंद सावंत यांनी स्वत:चा ठसा देश पातळीवर उमटविला. प्रदुषणावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक व्हेईकल्स काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांत चार्जिंग स्टेशनसह उपलब्ध करून देण्यात अरविंद सावंत मंत्रीपदाच्या कालावधीत आग्रही व अग्रेसर होते. कश्मीर, पंजाब पासुन सर्व राज्यात स्वत: भेट देऊन त्यांनी इलेक्ट्रिक व्हेईकल्स चे लोकार्पण केले. अभ्यासू वृत्तीस अनुसरुन विविध पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे पुनर्जीवीकरण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करून त्यांनी स्वत:च्या कार्यशैलीची झलक दाखवली. रिअलटाईम डॅशबोर्ड सारखे आधुनिक तंत्रज्ञान अवजड उद्योग खात्यात विकसित करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे.
केंद्रीय मंत्रीपदाच्या अत्युच्च पदावर लक्षणीय कारभार चालवताना महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची धामधुम सुरू झाली. मुख्यमंत्री पदाच्या कालावधीसह सर्व पदांचे समान वाटप अशा सूत्रावरती शिवसेना – भाजपा ने युती म्हणून निवडणूका लढल्या. सुस्पष्ट विजय अपेक्षेनुरुप युतीस प्राप्त झाला. सर्व अगदी दृष्ट लागल्याप्रमाणे चालू होते आणि यात खडा पडला भाजपाच्या कपटीपणामुळे! निवडणूक पूर्व दिलेल्या शब्दावरुन घुमजाव करत विजयश्री पश्चात त्यांनी मुख्यमंत्री पदावरील शिवसेनेचा हक्क नाकारला. ते देखील असत्य दावे करून ! वंदनीय बाळासाहेबांनी शब्द पाळण्याचा संस्कार दिला आणि शिवसेना याच तत्त्वावर आजतागायत वाटचाल करत आली. शब्दास पलटणाऱ्या भाजपाबरोबर पूढील प्रवास न करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी घेतला. १० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री साडे अकरा वाजता अरविंद सावंत यांचा फोन खणखणला, उद्धवसाहेबांनी अरविंद यांना राजीनामा देण्यास सांगितले. क्षणाचाही आढावा न घेता अरविंद सावंत यांनी होकार दिला, पहाटेच्या विमानाने थेट दिल्ली गाठली, सन्माननीय पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द केला व ताठ मानेने हा निष्ठावंत शिवसैनिक पत्रकार परिषदेस सामोरा गेला. हातात अभिमानाने राजीनामा झळकवुन असत्याची साथ सोडल्याचे जाहीर केले. आणि समस्त शिवसैनिकांच्या, महाविकास आघाडीच्या समर्थकांच्या हृदयात अढळ पद प्राप्त केले.
आजच्या काळात पदासाठी पक्ष सोडणारे पदोपदी आढळतील परंतु पक्षासाठी हसत पदाचा त्याग करणारा अवलिया म्हणजे ‘अरविंद सावंत’!
महाविकास आघाडीच्या वाटचालीची मुहुर्तमेढ स्वत:च्या कृतीद्वारे रोवणारे अरविंद सावंत तत्पश्चात देखील सर्व आघाड्यांवर कार्यरत आहेत. कोरोना विषाणू संक्रमणाच्या आपत्तीत जनतेच्या खांद्याला खांदा लावून ते उभे राहिले. महाराष्ट्रातील नागरिकांसह काश्मीर ते कन्याकुमारी कुठल्याही राज्यातील स्थलांतरितांच्या अन्नधान्याचा प्रश्न त्यांनी स्वत: अहोरात्र लक्ष घालून सोडवला. हजारोंच्या रेशनची, भोजनाची, जीवनावश्यक वस्तुंची व्यवस्था केली. अनेक रुग्णालयांना ओटी किट्स, पोलीस स्थानकांत, वाहतुक पोलीसांकरिता, महानगरपालिका वॉर्ड ऑफिस मध्ये पीपीई कीट, फेस शील्ड्स, हातमोजे व मुखपट्ट्या (मास्क), सॅनिटायजर, शाखांना ऑक्सिजन सिलेंडर्स, विटॅमिनयुक्त फळाच्या रसाचे पॅकेट्स अशा विविध गोष्टींचे हजारोंच्या संख्येने स्वत: भेट देऊन वाटप केले. जातीने लक्ष घालून आपत्ती व्यवस्थापन कक्ष असो, अगदी रेड झोन मार्क केलेला कोविड बाधित भाग असो, पोलीस स्थानके, वादळाच्या शक्यतेमुळे स्थलांतरित असो, रक्तदान शिबिरे असो, आरोग्य सल्ला – चिकित्सा शिबिरे असो… प्रत्येक स्थानी स्वत: उपस्थित राहून लोकांना धीर दिला व अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. अडचणीत असलेल्या रुग्णांना उपचार व्यवस्था करुन देतानाच रुग्णालयांनी अवाजवी शुल्क आकारली कळताच अनेकांना न्यायदेखील मिळवून दिला.
केवळ साहित्य / अन्नधान्य / जीवनावश्यक वस्तुंच्या वाटपापर्यंत सहभाग मर्यादित न ठेवता स्वत:चे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सर्वप्रथम त्यांनी दिले; महानगर टेलिफोन निगम कामगार संघातर्फे रु. पंचवीस लाख, महानगर टेलिफोन निगम कर्मचार्यांच्या पतपेढीच्या वतीने रु. अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा, शिवसेना एसटी कामगार सेनेच्या वतीने रु. पाच लाखांचा निधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९’ साठी सविनय सादर केला.
‘युनिसेफ’ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंटरियन अवार्ड फॉर चिल्ड्रन’ हा पुरस्कार अरविंद सावंत यांना भारतातील लहान मुलांचे जीवन सुधारण्यासठी महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल देण्यात आला. अरविंद सावंत यांना लोकसभेत ‘शिक्षणाचा हक्क’, ‘मुलांवरील अत्याचारांपासुन त्यांची सुरक्षा’ ‘कुपोषण आणि बाल आरोग्य’ या संदर्भात चर्चासत्रातील त्यांचा उल्लेखनीय सहभाग आणि लोकसभेत उपस्थित केलेले प्रश्न, या सर्वांचा विचार करून २०१८-१९ वर्षासाठी उपरोक्त पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
२०१४–२०१९ कालावधीत लोकसभा सत्रात हजर राहण्यात, मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न विचारण्यात, लोकहिताच्या चर्चेत सहभागी होण्यात अख्ख्या देशात सर्वोच्च स्थान प्राप्त केलेले, ‘फेम इंडिया’ द्वारे २५ प्रवर्गांमध्ये सर्वश्रेष्ठ प्रतिभा दाखविणाऱ्या कर्मयोद्धा खासदारांची निवड करण्यासाठी केल्या गेलेल्या सर्वेक्षणात ‘जज्बा’ प्रवर्गात देशातील सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून निवडले गेलेले; अख्ख्या देशातील ‘सर्वोत्कृष्ट युनियन लीडर’ म्हणून गौरवलेले; जीवनाधार या प्रथितयश फाऊंडेशनचा ‘मुंबै भूषण’अशा अनेक पुरस्कारांचे सार्थ मानकरी अरविंद सावंत यांची शिवसेनेचा गटप्रमुख, कामगार नेता, जिल्हा संपर्कप्रमुख, नेता – मुख्य प्रवक्ता, आमदार, खासदार ते केंद्रीय मंत्री अशी वाटचाल झाली तरी या माणसाचे पाय आजही जमिनीवर आहेत.
समाजसेवेच्या या अचंबित करणार्या वाटचालीत अरविंद सावंत यांना महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांची साथ कायम असते. खरं तर ते सर्व अरविंद सावंत यांना पालकच समजतात. या कर्मचाऱ्यांची कामगार संघ ही युनियन, त्याचे अध्यक्ष अरविंद सावंत, त्यांनी ‘जाणीव’ नावाचा ट्रस्ट स्थापन केला. निव्वळ जाणीव नाव देऊन ते थांबले नाहीत तर पुढे ब्रीदवाक्य लिहिले “जाणीव, मुळांची आणि मूल्यांची” !! सावंत यांच्या मते समाजातील प्रत्येकाने आपले मूळ विसरु नये, आणि त्या मुळाशी असलेली बांधिलकीही आणि त्या मूळ विचारधारणेला वर्धिष्णू करताना ‘मूल्ये’ खरं तर जीवन मूल्येही विसरु नये, असे त्यांचे म्हणणे. या न्यासातर्फे ते पुढे समाजकार्य वाढवणार आहेत. गोरगरीबांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण शक्य झाल्यास मोफत वा माफक दरात ते देऊ इच्छितात.
2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत दक्षिण मुंबईकरांनी त्यांच्या उपरोक्त कार्याची पोचपावती मतपेटीतून दिली आणि अरविंद सावंत पुन:श्च तिसर्या खेपेस खासदार झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी लोकसभा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेतेपदी त्यांची नियुक्ती केली.
खरे तर आजकालच्या राजकीय भाषेत कार्यसम्राट पण त्याच्या भाषेत कार्यतत्पर, कार्यनिष्ठ असा हा जनतेचा ‘आपला माणूस’, जाणीवेने भरलेला आणि नेणीवेने साकारलेला !