संदेश

जय महाराष्ट्र !

संदेश

सुज्ञ मतदार बांधवांनो आणि भगिनींनो,
जय महाराष्ट्र !!
लोकसभेची निवडणूक घोषित झाली ती देखील एका पार्श्वभूमीवर, आज सर्वात मोठा प्रश्न आहे की या देशात लोकशाही आणि बाबासाहेबांच संविधान सुरक्षित राहिल का?
यासाठी आपले भाग्य असे की देशातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी (AAP), समाजवादी पार्टी (सपा), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा), आंबेडकरवादी चळवळीतील रिपब्लिकन विचारांची संघटना ‘महाविकास आघाडी’ (INDIA Alliance ) स्थापन करून एकत्रितपणे देशाच्या संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी काम करण्यास कटीबद्ध झाले आहेत.
याच महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात यावं म्हणून आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा आदेश येताच एका क्षणात राजीनामा देऊन पुन्हा आपल्या सेवेत धडाडीनं काम करण्यास रुजु झालेले खासदार अरविंद सावंत यांना त्यांनी ‘३१ – मुंबई दक्षिण’ या लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि उभ्या महाविकास आघाडीस आनंद झाला कारण असा एक निष्ठावंत आणि सेवाभावी कार्यकर्ता आपल्या मतदार संघास उमेदवार म्हणून लाभला.
अरविंद सावंत यांनी सर्वसामान्य गरीबांच्या मुलांना सुद्धा उच्च दर्जाच शिक्षण मिळावं म्हणून सरकारने शिक्षणाच्या मुलभूत अधिकाराचा कायदा आणला. त्यामध्ये सुधारणा करून दर्जेदार शिक्षणाचा अधिकार द्या अशी मागणी करून या विदयार्थ्याच्या अभ्यासक्रमातील ही विषमता त्वरित दूर करा असा आग्रह धरला. मुंबईतील गिरणी कामगार असु द्या किंवा त्यांच्या मोडकळीस आलेल्या चाळी असु द्या, मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जमिनीवर उभ्या असलेया शिवडीतील बीडीडी चाळीचा विकास, शिवडी ते दारूखान्यातील मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जमिनी वरील झोपड्या, व्यापार्‍यांना होणारा जीएसटी चा त्रास किंवा आयकर विभागाकडून होणारा त्रास, महिलांचे संरक्षण आणि आरक्षण, बेरोजगार तरुणांना नोकर्‍या, महाराष्ट्रातून अन्य राज्यात नेले जाणारे उद्योग , राममंदिराच्या उभारणीचा विषय असो वा मॉब लिंचिंग सारख्या सामाजिक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला. मणिपूरमधील अत्याचार, कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रांत संदर्भातही त्यांनी आवाज उठवला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा,मुंबई सेंट्रल टर्मिनस ला नाना शंकर सेठांचे नाव यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. असा हा दिल्लीतील बुलंद आवाज म्हणजे अरविंद सावंत !!!
सामाजिक प्रश्नांच भान असणारा हा नेता! संकटकाळी रस्त्यावर उतरून स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांना सेवा देताना पाहिलंय. मग ते निसर्ग किंवा तौक्ते सारखं वादळ असु द्या किंवा कोविड सारख महाभयंकर संकट असु द्या. कोविड संकटाच्या काळात हा माणूस पोलीस स्टेशन ,रेल्वे पोलीस, हॉस्पिटलमध्ये जाऊन पीपीइ कीट, मास्क, स्क्रब देत फिरत होता. अन्नधान्य पुरवठ्यापासुन भोजन व्यवस्था प्रत्यक्षात रस्त्यावर उतरुन करत होता.
त्याकाळात तत्कालिन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजींनी जे काम केल ते आपण विसरु शकत नाही. ज्या प्रकारे त्यांनी जनतेशी संवाद साधला आणि या संघर्षात जनतेला सोबतीला घेऊन कोविड वर जी मात केली त्याबद्दल त्यांना उभ्या महाराष्ट्राने ‘कुटुंबप्रमुख’ ही उपाधी दिली. त्यांच्या या कार्याच कौतुक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्युएचओ), न्युयॉर्क टाइम्स, नीती आयोग, सर्वोच्च न्यायालयाने केलं. त्या काळात राज्य कारभार कसा चाललाय याची देशात अनेक सर्वेक्षणे झाली तेंव्हा सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांचे नाव वारंवार सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून नावाजले गेले.
त्याच काळात गुजरातमध्ये शववाहिनीतून प्रेत रस्त्यावर पडत होती आणि उत्तरप्रदेशमध्ये गंगा प्रेतांनी दुथडी भरून वहात होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील उद्धवजींचे आणि महाविकास आघाडीचे काम आपल्याला विसरता येणार नाही.
अशा उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसुन त्यांचे सरकार पाडले आणि राज्यात एक बेकायदेशीर सरकार स्थापन झाले. त्या सरकारमधील काही माणसे आपल्या दरवाजात आता येऊ लागली आहेत. त्यांना एकच प्रश्न विचारा, कोविड काळात तुम्ही कुठे होता? म्हणजे कळेल, की स्वार्थासाठी कोण आलं आणि परमार्थासाठी कोण उभ आहे!
आज खरे प्रश्न कोणते आहेत? महागाई ( गॅस सिलिंडर, तूर डाळीचे तेव्हा काय भाव होते आणि आज काय आहेत ) बेरोजगारी, (गेल्या पाच वर्षात तरुणांना सरकारी , निमसरकारी व खाजगी कायमस्वरूपी नोकरी मिळाली नाही ) दर वर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार होते त्यावर काय झाले ? महिलांवरील अत्याचार (ऑलीम्पिक मध्ये देशासाठी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या महिला त्यांच्यावर अत्याचाऱ करणाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून न्यायासाठी लोकसभेबाहेर रस्त्यावर बसल्या, मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड काढणारी देशाला कलंकित करणारी घटना घडली) , शेतकर्‍याच्या मालाला हमीभाव न मिळाल्याने सातत्याने होणार्‍या आत्महत्या, (या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात ७०० शेतकऱ्याचे झालेले मृत्यू आणि त्यांना आतंकवादी, खलिस्तानवादी ठरविणारे सरकार, नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान…, ज्येष्ठ नागरिक तर सरकारच्या खिजगणतीतही नाही, गेली दहा वर्षे त्यांची तुटपुंजी पेन्शन वाढवून द्या यासाठी खासदार अरविंद सावंत आवाज उठवीत आहेत,पाठपुरावा करीत आहे , परंतु दुर्दैवाने याबद्दल देशाच्या पंतप्रधानांसहीत कोणीही चकार शब्द काढत नाहीत, त्यांना याबद्दल संवेदना नाहीत. अशीच संवेदनाहीन माणसे आता आपल्यासमोर मते विकत घेण्यासाठी ‘बोला तुमचे काय काम आहे, किती पैसे देऊ?’ विचारत किंबहुना त्याच काळ्या पैशाचा वापर करुन काही ठिकाणी काम करण्याची प्रलोभन देत आहेत. विसरू नका, वाल्याला जेंव्हा पकडले तेंव्हा त्याच्या पत्नीनेही त्याच्या लूटीला साथ दिली नाही. आपण यातुन शिकण्यासारखे आहे की या लुटमार केलेल्या लोकांच्या पैशातुन क्षणभंगुर फायदा घेण्यासाठी पूढे येणारे नागरिक आणि वर्षाचे 365 दिवस सेवाभावी वृत्तीने काम करणारी तत्पर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष यातील फरक आपण जाणला पाहिजे. त्यांच्या अनैतिक भ्रष्ट मार्गाने आलेल्य पैशाने आपले घर आपण सजवणार का? असे केलेत तर आपण आजच ओलीस झालो हे लक्षात ठेवा!
देशात आज दडपशाही सुरू आहे, हुकूमशाहीच्या दिशेने पावले पडत आहेत, देश तानाशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळेच आज देशातील न्यायालये, इडी, सीबीआय इ. स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्यदेखील अबाधित राहिले नाही. अशा वेळेला आपण काय करणार? असा प्रश्न पडता कामा नये, कारण बाबासाहेबांच्या संविधानने सर्वात मोठा अधिकार आपल्याला दिलेला आहे, तो म्हणजे ‘ मतदानाचा अधिकार ‘ !
म्हणून, घ्या शपथ,
बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला अधिकार मी विकणार नाही.
माझ्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरुन मी मतदान करेन.
ते करताना संविधानाचे आणि लोकशाहीचे सर्वतोपरी रक्षण ही माझी प्राथमिकता असेल.
राजकीय सामाजिक अंध:कारमय वातावरणात मार्गक्रमण करण्यासाठी एकच पर्याय, हाती मशाल घ्या, हृदयात मशालीची धग ठेवा आणि मशाल चिन्हासमोरील बटण दाबून देशाच्या लोकशाही संरक्षणासाठी उभ्या असलेल्या लढ्यात सहभागी होण्याचे पुण्याचे काम करा.
ते तुम्ही करालच आणि स्वाभिमानी महाराष्ट्र काय असतो हे दाखवून द्याल असा विश्वास व्यक्त करतो!

चिन्ह : मशाल