जय महाराष्ट्र !
१६ मे २०१४ ! आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आणि अविस्मरणीय क्षण ! लोकसभेच्या निवडणूकांचे निकाल देशातील सर्व वाहिन्यांवर घोषित होत होते ! पहिली फेरी झाली आणि अरविंद सावंत आघाडीवर अशी बातमी आली. पुढील सगळ्या फेऱ्यांमध्ये माझी आघाडी वाढत गेली आणि अंतिम निकाल घोषित झाला. १,२८,००० च्या मताधिक्याने अरविंद सावंत विजयी झाले ! निवडणुकीतील जायन्ट किलर म्हणून उदो उदो सुरु झाला होता. काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन दूरसंचार राज्यमंत्री श्री. मिलिंद देवरा, मनसेचे बाळा नांदगावकर आणि आपच्या श्रीमती मीरा सन्याल या साऱ्यांचा पराभव करून माझा विजय झाला.

मतमोजणी केंद्राच्या बाहेर पडलो आणि आश्चर्याचा धक्का बसला. ज्या मातोश्रीच्या चरणी आम्ही आमचा विजय अर्पण करतो त्या मातोश्रीची माऊली माननीय सौ. रश्मीवहिनी ठाकरे आणि आमचा लाडका युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे समोर उभे ! त्यांनी मला पेढा भरवला तो क्षण…!
लोकसभेत पहिले पाऊल टाकले. एवढ्या भव्य सभागृहात देशाच्या १२५ कोटी जनतेच ५४४ खासदार प्रतिनिधित्व करतात, त्यात एक गिरणगावातला शिवसैनिक वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने, मा. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या साथीने, मित्रपक्ष भाजपचे त्यावेळी पंतप्रधान पदाचे उमेदवार मा. नरेंद्र मोदीजी यांच्या सहकार्याने आणि सर्वात महत्वाचे म्हणजे युतीचे तमाम निष्ठावान कार्यकर्ते व मतदार यांच्यामुळे या सभागृहात आसनारुढ झाला. इथे पंडीत नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, एस. एम. जोशी, सी. डी. देशमुख, इंदिरा गांधी, प्रमोद महाजन, मनोहर जोशी यांसारख्या दिग्गजांनी जे सभागृह गाजवले त्याच सभागृहात एका सर्वसामान्य शिवसैनिकाचा प्रवेश झाला.

५ जून २०१४ रोजी शपथ घेतली व मराठी आवाज लोकसभेत दुमदुमला कारण शपथ मराठीत आणि शिवसेनाप्रमुखांना वंदन करुन घेतली ! !
त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे सातत्याने मार्गदर्शन करत, मनोधैर्य वाढवत. परिणामी सरकारला सुद्धा खडे बोल सुनवायला मी कमी पडलो नाही. मग जैतापूरचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचा असो, बेळगावचा असो व गिरणी कामगारांचा असो. सुदैवाने लोकसभेतील भाषणे चलचित्रांकीत (व्हिडियो) स्वरुपात उपलब्ध आहेत. आपण सारेजण माझ्या संकेतस्थळावर माझी भाषणे पाहु शकता.
माझा मतदारसंघ म्हणजे गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत अशा जनतेचा मतदारसंघ ! या सगळ्यांच्या संदर्भातील जे जे म्हणून प्रश्न केंद्रससकारशी निगडीत आहेत त्या त्या प्रश्नांवर मला आवाज उठवता आला याचे मला समाधान आहे. पण म्हणून सर्व प्रश्न सुटले असे नाही. लोकसभा निवडणुकीच्या साधारण वर्षभर आधी आदरणीय उद्धवसाहेबांनी मला उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यानंतर अधिकृत घोषणा न होता काम सुरु झाले होते. दरम्यान अनेक श्रीमंतांनी मातोश्रीच्या पायऱ्या झिजवल्या. परंतु उद्धवसाहेबांनी माझी उमेदवारी कायम केली. ते ऋण आयुष्यात विसरता येणार नाहीत. निवडुन आल्यानंतर आता दोन वर्षे लोटली आहेत. शिवडी, भायखळा, मुंबादेवी, कुलाबा, मलबार हिल, वरळी अशा विस्तृत पसरलेल्या ह्या मतदारसंघात अनेक समस्या होत्या आणि आहेत. ह्या समस्या सोडविण्यासाठी, दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी मी निवडून आल्यापासून काय-काय प्रयत्न केले, कोणती कामे मार्गी लावली आणि कोणत्या कामांसाठी पाठपुरावा सुरु आहे. या सर्वांची माहिती या संकेतस्थळावर आहे.
मी लोकांमध्ये मिसळणारा व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि त्यांच्यातीलच एक असल्यामुळे लोकांच्या माझ्याकडून साहजिकच अपेक्षा वाढल्या आहेत. अनेक प्रलंबित प्रश्न आहेत जे प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत. करी रोडचा पूल, पाईप गॅस सर्विस, मध्य व पश्चिम रेल्वेसंबंधिचे विविध प्रश्न, रेल्वेच्या प्रवाशांच्या सुखसोयींसाठी अनेक उपाय सुचवले व काहींची अंमलबजावणी देखील झाली याचे समाधान आहे. प्रियदर्शनी पार्क (नेपियन सी रोड) सुशोभीकरण, चंडिका संस्थान (शिवडी) येथे पंप रुम बसवुन दीर्घकाळ प्रलंबित पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे, पोद्दार हॉस्पीटल येथे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आसनव्यवस्था, बाणगंगा येथे व्यायामशाळा, ज्युलिएट हाऊस येथे ज्येष्ठ नागरिक कट्टा आदी अनेक विकासकामे खासदार निधीतून करण्यात आली.
निवडणूकीत दिलेले प्रत्येक आश्वासन व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणार आहे. कोस्टल रोड, मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी निधी, क्लस्टर डेव्हलपमेंट आदि अनेक मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांवर मी लोकसभेमधे आवाज उठवला आहे. विविध केंद्रीय समित्यांमध्ये केवळ हजेरी न लावता प्रत्येक प्रश्नावर परखड मत मांडले आहे, योग्य त्या सूचना केल्या आहेत व त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला आहे. कामासंबंधी तक्रारी असतील तर त्या जनतेने माझ्या कार्यालयाशी थेट संपर्क साधून माझ्यापर्यंत पोहोचवाव्यात.
शिवसेना राजकीय पक्ष असला तरी ८० टक्के समाजकारणावर आमचा भर आहे व त्यानुसार सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे. आपले आशीर्वाद असेच राहुद्या ही प्रार्थना !