‘आपला माणूस’ खासदार अरविंद सावंत
शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या प्रचारासाठी सातत्याने झटणारे लोकप्रिय नेतृत्व, सर्वांचे लाडके भाई, दक्षिण मुंबईतील जनतेचा हक्काचा ‘आपला माणूस’, शिवसेनेचे उपनेते – प्रवक्ते, महाराष्ट्राचा दिल्लीतील बुलंद आवाज, अनेकविध संसदीय प्रणालीतील मानाची पदे भूषविणारे अरविंद सावंत यांनी आपले अष्टपैलूत्व, मुत्सद्देगिरी व राजकारणाची समज आपल्या कार्याने सिद्ध केली आहे.
गटप्रमुख म्हणून राजकारणातील प्रवासाची सुरुवात करुन आज मुंबईचे प्रतिनिधित्व देशपातळीवर यशस्वीपणे करतानाच थेट संयुक्त राष्ट्र महासभा म्हणजेच ‘युनो’त आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करुन अरविंद सावंत यांनी प्रत्येक शिवसैनिकास व प्रत्येक दक्षिण मुंबईतील रहिवाशास अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे!
2014 च्या लोकसभा निवडणूकीत १,२८,००० च्या मताधिक्याने अरविंद सावंत निवडणुकीतील जायन्ट किलर म्हणून विजयी झाले ! काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन दूरसंचार राज्यमंत्री श्री. मिलिंद देवरा, मनसेचे बाळा नांदगावकर आणि आपच्या श्रीमती मीरा सन्याल या साऱ्यांचा पराभव करून भाई विजयी झाले आणि प्रत्येक शिवसैनिकाचा उर आनंदाने भरून आला, हे फलित होते हिंदूहृदयसम्राटांच्या आशीर्वादाचे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाचे, युवासेनाप्रमुख आदित्यसाहेबांच्या पाठिंब्याचे, शिवसेना, युवासेना, स्थानिय लोकाधिकार समिती, शिवसेना अंगीकृत संघटना, महानगर टेलिफोन निगम कामगार संघ, भाजप तसेच युतीत सामिल सर्व घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे व प्रामुख्याने भाईंच्या अनेक दशके अविरत कार्य व निष्काम सेवेचे!
शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेच्या स्थापनेपासुनच दोन प्रमुख विचार दिले, एक म्हणजे “80 टक्के समाजकारण – 20 टक्के राजकारण, जनसेवेचे व्रत हाच ध्यास”; आणि दुसरा विचार म्हणजे “जातीपातीच्या भिंती पाडण्यासाठी ब्राम्हण-ब्राम्हणेतर, मराठा-मराठेतर, शहाण्णवकुळी/ब्यावण्णवकुळी, घाटी-कोकणी, स्पृश्य-अस्पृश्य हे जातीभेद गाडून, महाराष्ट्रासाठी मराठी म्हणून एक होण्याचा मंत्र.” अरविद सावंत याच सुत्रांवर वाटचाल करत गत अनेक दशके मराठी माणसासाठी, हिंदुस्थानातील हिंदूसाठी अविरत कार्यरत आहेत.
शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासुनच अरविंद सावंत आघाडीचे शिलेदार होते. शिवसेना पक्ष बांधणीमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी केली. वक्तृत्व, मुत्सद्देगिरी व समाजकारण यांचा त्रिवेणी संगम म्हणजे अरविंद सावंत. अरविंद सावंत यांच्यातील त्यांच्या निकटवर्तीयांना देखील अचंबित करणारा गुण म्हणजे अथक, अविश्रांत काम करण्याचा झपाटा…
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेशी बांधिलकी जपणारे व कार्यरत असणारे लढाऊ नेते म्हणून अरविंद सावंत लोकप्रिय आहेत. गोरगरीब जनता, शेतकरी, गरजु नागरिक यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी समाजसेवेचा वसा जपला. सामान्य जनांसाठी, कार्यकर्त्यांसाठी, गरजुंसाठी सौम्य, प्रेमळ व सर्वांना आपलेसे भासणारे चंद्रासारखे शीतल वाटणारे अरविंद सावंत ह्याच जनतेसाठी, कार्यकर्त्यांसाठी, गरजुंसाठी अन्यायाविरोधात जेंव्हा आपली तलवारीच्या धारीसारखी तळपती जिव्हा चालवतात तेंव्हाचे त्यांचे आक्रमक रुप मात्र सूर्यासारखे रौद्र भासते. बाळासाहेबांच्या प्रखर विचारांच्या मुशीतुन घडलेले अरविंद सावंत यांचे व्यक्तित्व म्हणजे हिंदुत्वाच्या विचाराने झपाटलेला शिवसेनाप्रमुखांच्या ‘बाळ’कडूचा अविष्कार, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
अरविंद सावंत यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भाईंचे वक्तृत्व! विधानपरिषदेतील पहिल्याच भाषणाला विधिमंडळातील ‘राष्ट्रकुल संसदीय मंडळा’च्या वतीने देण्यात येणार्या ‘उत्कृष्ट भाषणाचा’ पुरस्कार व तत्कालीन राज्यपाल श्री. पी. सी अलेक्झांडर यांच्याकडुन विशेष गौरव भाईंच्या वक्तृत्वशैलीस मिळालेली दाद… ‘तू हाताळलेल्या विषयांचा पल्ला खूप मोठा आहे. विचारांची खोली जाणवते. देश, महाराष्ट्र, मुंबई, मराठी भाषा या शिवसेनेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर बोलताना तुझी रसवंती विशेष खुललेली दिसते.’ या शब्दात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी भाईंच्या वक्तृत्वाची तारीफ केली. ‘अरविद सावंत यांनी विधिमंडळाच्या कामकाजावर उमटवलेला ठसा हीच अरविंद सावंत या शिवसेनेच्या शिलेदाराच्या कार्याची पावती’, या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. अभ्यासपूर्ण भाषण, मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषांवरील प्रभुत्व व धारदार आवाजातील संवाद साधल्याप्रमाणे भासणारी परंतु मुद्देसूद भाषणशैली ह्यांचा सुयोग्य मिलाफ म्हणजे भाईंचे वक्तृत्व!
1968 साली गटप्रमुख म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेल्या अरविंद सावंत यांनी सीमा आंदोलनात 1969 साली महत्वाची भूमिका बजावली. क्रिकेट, लॉन टेनिस, कबड्डी, कॅरम, खो-खो आदि क्रीडाप्रकारांत विशेष रुची असणारे बुद्धिमान अरविंद सावंत यांनी त्यावेळेपासुनच शिवसेनेत अनेक जबाबदारीची पदे भुषवली. राजकारणात पाऊले पूढे टाकतानाच, प्रिन्सीपल वामनराव महाडिक यांच्या क्लासेसमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना शिकविणे, मोखाडा – जव्हार आदी आदिवासी पाड्यांतील जनतेसाठी सातत्याने समाजकार्य, अनेक आरोग्य शिबीरे, आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात अशा विविध मार्गांनी अरविंद सावंत यांनी समाजकारणातदेखील स्वत:चा ठसा उमटविला. अनेक भागांमध्ये संपर्कप्रमुख नात्याने बाळासाहेबांचा दूत म्हणून त्यांनी तो-तो विभाग पिंजून काढला. शिवसेनेची केवळ तिथे ओळख करुन नाही दिली तर ती रुजवली आणि वाढवली, नावारुपाला आणली. तसेच अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेत नेतृत्वाने वेळोवेळी सोपविलेल्या सर्व जबाबदार्या चोखपणे पार पाडल्या.
पांढरपेशा मराठी मध्यमवर्गीयाप्रमाणे नोकरीची वाटचाल करत शिवसेनेच्या कार्यातून पुढे आलेले आपल्या सर्वांचे लाडके ‘भाई’ म्हणजेचे शिवसेनेचे उपनेते श्री. अरविंद सावंत! परळ – लालबाग – भायखळा – शिवडी – माझगाव आदी विभागातील मराठी कुटुंबे त्याकाळापासूनच शिवसेनाप्रेमी… हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला. ह्याच परिसरातील शिवडी येथील अरविंद सावंत म्हणजे बेडर, निधड्या छातीचा, वंदनीय शिवसेनाप्रमुखांचा आदेश येताच काहीही करायला तयार असणारा कट्टर, निष्ठावंत, कडवा शिवसैनिक अगदी लहान वयापासूनच.
भाईंच्या वागणुकीतुन जाणवतात ते एकनिष्ठेचे, परपीडा दूर करण्याचे संस्कार! गत 30 वर्षे महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचे अध्यक्ष पद त्यांनी लिलया पेलले, आणि त्यावर मोहोर लावली ती अख्ख्या देशातील ‘सर्वोत्कृष्ट युनियन लीडर’ पुरस्काराने!
दांडगा व्यासंग असणाऱ्या अरविंद सावंत यांना साहित्य, कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण या सर्वच क्षेत्रांची सखोल माहिती आहे. अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी आधुनिक समाजमाध्यमांवर देखील प्रभुत्व मिळवले आहे. समाजातील वेगवेगळ्या स्तरातील नागरिकांच्या समस्या आणि अडचणींची त्यांना जाण आहे. नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजांचे त्यांना भान आहे. विषय कोणताही असो त्याच्या मुळाशी जाणे ही त्यांची वृत्ती आहे. संपूर्ण तयारीनेच सभागृहात विषय मांडण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी ते संसदेत उभे राहतात तेव्हा सत्ताधारी पक्षासह विरोधकदेखील त्याचे भाषण, त्यांचे मुद्दे शांतपणे ऐकतात हेच त्यांचे वेगळेपण.
केवळ आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला व हिंदुस्थानला भेडसावणाऱ्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण भाषणांनी लोकसभेत वाचा फोडुन अरविंद सावंत यांनी आपला ठसा उमटविला आहे.
दहशतवाद पसरवण्यासाठी पैसा पुरविल्याप्रकरणी वादग्रस्त धर्मप्रसारक डॉ. झाकिर नाईक वर बंदी घालण्याची निडर मागणी देशात अरविंद सावंत यांनी सर्वप्रथम केली. लोकसभेत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ चा नारा देऊन त्यांनी संसद दणाणून सोडली.
अरविद सावंत यांची नियोजनबद्धता व सखोल अभ्यासपूर्ण जाण झळकते चर्चेत त्यांनी मांडलेल्या भूमिकेतुन. लोकसभेत चर्चेसाठी येणाऱ्या बाबींवर योग्य त्या मुद्यांना पाठिंबा दर्शवितानाच ते नेमक्या सुधारणा सुचवितात आणि त्यांची महत्त्वपूर्ण सूचना सदर बिल, कायदा, अध्यादेश बनविणारे मंत्री व यंत्रणा देखील सकारात्मक रित्या विचारात घेतात.
देशपातळीवरील धोरणे, विधेयके, भूमिका यांवर त्यांनी जनतेवर होणाऱ्या परिणामांचा सखोल विचार करुन अभ्यासपूर्ण सूचना केल्या आहेत.
दक्षिण मुंबई खासदार श्री. अरविंद सावंत यांनी लोकसभेत उपस्थित केलेले व विविध खात्यांच्या मत्र्यांकडे पाठपुरावा केलेले महत्त्वपूर्ण विषय व मागण्यांवर दृष्टीक्षेप :
- हिंदुस्थान – पाकिस्तान समस्या व त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानसोबत सर्व संबंध तोडण्याची मागणी
- वादग्रस्त धर्मप्रसारक डॉ. झाकिर नाईक वर बंदी घालण्याची निडर मागणी देशात सर्वप्रथम केली
- कश्मीर प्रश्न, कलम 370 रद्द करुन समान नागरी कायदा अंमलबजावणीची मागणी
- तिहेरी तलाक कायदा संदर्भात महत्वपूर्ण सूचना, कश्मीरमधे देखील लागु करण्याची मागणी
- रोहिंग्या रेफ्युजी व त्या पार्श्वभूमीवर सीमेवरील सुरक्षा
- संविधानातील विविध कलमांच्या अंमलबजावणीसंदर्भात सूचना
- भ्रष्टाचार निवारण विधेयकावर सूचना
- वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर पॅरीस ॲग्रीमेन्टकडे लक्ष वेधणे
- मुंबईकडुन देण्यात येणाऱ्या करावर आधारित मुंबईसाठी अतिरिक्त विकासनिधीची मागणी
- मोफत व अनिवार्य बाल शिक्षण अधिकार संदर्भातील सुधारणा सुचविल्या
- मराठा आरक्षण तसेच धनगर व इतर आरक्षणाचे प्रश्नावर सुस्पष्ट भूमिका
- शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी
- शेतकऱ्यांच्या विविध समस्या – न्यूनतम मूल्य निर्धारणीची गरज
- महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नात केंद्र सरकारने लक्ष घालण्याची मागणी
- भूमीपुत्रांना रोजगारात प्राधान्य देण्याची मागणी
- मराठी भाषेस ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळवुन देण्यासाठी प्रयत्न
- रेल्वेच्या पूलांच्या पुनर्बांधणीसंदर्भात सातत्याने मागणी व पाठपुरावा, दक्षिण मुंबईमधील अनेक पूल आपल्या कार्यकाळात पुनर्बांधणी करण्यात आले.
- रेल्वे अपघात व त्यासंदर्भात उपाययोजना, ड्रोन सारख्या सुविधांची मागणी
- रेल्वेच्या टाईमटेबलमधील अनियमितता व त्यासंदर्भातील सुधारणा, एलिव्हेटेड ट्रेन्स ची मागणी
- रेल्वेस्थानकांवरील सेवा-सुविधा
- रेल्वेस्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदलण्यासाठी यशस्वी प्रयत्न
- जुन्या मोडकळीस आलेल्या ईमारतींच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
- शिवडी येथील बीडीडी चाळीच्या समस्येकडे सातत्याने लक्ष पुरविण्याची मागणी, मा. मंत्री श्री. नितीन गडकरी ते थेट पंतप्रधानांपर्यत समस्या निराकरणाची मागणी
- मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर स्थित रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण
- एनटीसी मिलच्या जागेवर स्थित रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण
- शापुरजी पालनजी कॉलनी (परेल) येथील इंडियन कॅन्सर सोसायटी व टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या मालकीच्या जमिनीवर स्थित झोपडपट्टीमधील रहिवाशांना भेडसावणारी पुनर्वसनाची समस्या
- विविध बोर्ड मधील विद्यार्थ्यांसाठी निवडक विषयांसाठी समान अभ्यासक्रमाची सातत्याने मागणी
- जीएसटी मुळे विविध व्यापारी क्षेत्रांवर होणारे दुष्परिणाम अधोरेखित करुन लोकसभेत तसेच विविध खात्यांच्या मत्र्यांकडे पाठपुरावा करुन व्यापाऱ्यांना करात न्याय्य सवलत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न
- सुवर्णकारांचे प्रश्न, कपडा व्यापाऱ्यांचे प्रश्न, स्थानिक व्यापार्यांचे प्रश्नांचे निराकरण करण्यात अग्रेसर
- सर्व शिक्षा अभियानात सुधारणा सुचविल्या
- जैतापुर अणुउर्जा प्रकल्पाच्या दुष्परिणामांवर लोकसभेत प्रकाशझोत टाकला.
- भूमी अधिग्रहण कायद्याच्या परिणामांवरती प्रकाश झोत टाकुन सुधारणा सुचविल्या
- रेल्वे भरतीतील घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आवास योजनेतील सुधारणा
- विविध पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे पुनर्जीवीकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न व नियोजनबद्ध उपाययोजना सुचविणे.
- पक्का घर योजनेत महत्वपूर्ण सुचना सुचविल्या
- स्त्रियांना उपनगरीय रेल्वेच्या डब्यात शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी
- महिला व बाल सुरक्षासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना
- किडनी आजाराने त्रस्त रुग्णांना अपंगांकरिता राखीव डब्यातुन प्रवास करण्यासाठी परवानगी
- रस्त्यावरील अपघातांचे वाढते प्रमाण व नियोजनबद्ध उपाययोजना सुचविणे.
- जुन्या गड-किल्ल्यांचे संवर्धन इ.
असे अनेक विषय अभ्यासपूर्ण भाषणाद्वारे मांडून सरकारला त्यांनी दखल घ्यायला भाग पाडले.
खासदार अरविंद सावंत यांच्या भाषणाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक महत्त्वपूर्ण विषयावर हिंदुस्तानातील एकमेवाद्वितीय द्रष्टे व्यक्तिमत्व, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिका ते लोकसभेत विषद करतात.
पेट्रोलियम व नॅचरल गॅस कमिटी; पार्लमेन्ट अंदाज कमिटी; कन्सल्टिंग कमिटी – आय टी या विविध महत्त्वपूर्ण केंद्रीय समित्यांवर सदस्यपद भूषविताना देशपातळीवरील अनेक धोरणांमध्ये अरविंद सावंत यांनी अनेक बहुमोल सूचना केल्या आहेत.
खासदारकीच्या काळात अरविद सावंत यांनी केलेले एक अजुन उल्लेखनीय कार्य म्हणजे दक्षिण मुंबईमधील रेल्वेस्थानकांवर बांधले गेलेले अनेक पूल! अनेक दशके प्रलंबित असणार्या अनेक रेल्वे पुलांची पुनर्बांधणी अरविंद सावंत यांनी अनेक स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करून पूर्ण करुन घेतली. मुंबई सेन्ट्रल रेल्वेस्थानकावर 200 बेन्चेस स्वत:च्या निधीतून देऊन त्यांनी प्रवाशांना आसनव्यवस्था उपलब्ध करून दिली. रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांना होणाऱ्या समस्येत व्यक्तिश: लक्ष घालून त्यांनी चर्चगेट – विरार ट्रेन्सना गर्दीच्या वेळेस सर्व स्थानकांवर थांबा मिळवुन दिला.
खासदाराचे प्रमुख कर्तव्य, मतदारसंघातील तसेच देशातील जनतेच्या समस्या, प्रश्न लोकसभेत मांडुन त्यांची उकल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे! यात अव्वल असणारे भाई स्थानिक खासदारनिधीतुन दक्षिण मुंबईतील जनतेच्या आवश्यकतांनुसार विकासकामे साकारण्यासाठी देखील तेवढेच सजग आहेत. नेमक्या गरजांचा अंदाज घेऊन ते निधी विनियोग करतात.
प्रशासकीय बाबींना त्यांनी विकासकामांमध्ये कधीही अडथळा ठरु दिले नाही. सँडहर्स्ट रोडला लागुन असलेली संरक्षक भिंत कोसळली तेंव्हा रेल्वेच्या अधिकार्यांनी भिंतीलगतच्या इमारती खाली न केल्यास ही संरक्षक भिंत बांधता येणार नाही अशी आडमुठी भूमिका घेतली होती परंतु खासदार अरविंद सावंत यांनी पालकमंत्री श्री. सुभाष देसाई यांना परिस्थिती कथन केली. व्यक्तिश: पाठपुरावा करून सुभाष देसाई यांच्या मदतीने जिल्हा नियोजन विकास महामंडळ निधीतून (District Planning Development Corporation (DPDC) funds) रु. दीड कोटीचा निधी वितरित करुन घेतला नागरिकांना दिलासा दिला.
भारतात प्रथमच खासदार निधीतून अर्पण करण्यात आलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व सुविधायुक्त जीवनरक्षक रुग्णवाहिका (जे. जे. रुग्णालयास) त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात तर ‘प्रियदर्शनी पार्कचे सुशोभिकरण व शिशुउद्यान’ भाईंच्या कल्पकतेचे प्रतीक! दक्षिण मुंबईतील सुशोभीत उद्याने, अनेक खुली सभागृहे, दुरुस्ती केलेल्या पाईपलाइन्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी आसनव्यवस्था (बेन्चेस), पाण्याच्या टाक्या, संरक्षक भिंती (प्रोटेक्शन वॉल्स), रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प, फुटपाथ, सार्वजनिक शौचालये, विविध शाळांमध्ये संगणक प्रशिक्षणाची सोय इत्यादी जागोजागी साकारली गेलेली लोकोपयोगी विकासकामे भाईंची सामाजिक बांधिलकी दर्शवितात.
गत 5 वर्षांत खासदार स्थानिक विकास निधी तसेच विशेष प्रयत्नांनी महानगरपालिका क्षे त्र विकास कामे, संरक्षण भिंत विकास कार्यक्रम, परिसर सुंदर बनविण्याचा कार्यक्रम, गलिच्छ वस्ती सुधार कार्यक्रम, स्मशानभुमी विकास कार्यक्रम इत्यादी विविध स्त्रोतांद्वारे 60 कोटीपेक्षा अधिक निधी त्यांनी दक्षिण मुंबईसाठी वितरीत करुन घेतला आहे. तसेच पंतप्रधान निधीद्वारे सुमारे 75 रुग्णांना एक करोड पंचवीस लाख हुन अधिक अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले आहे.
सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, सुरक्षा, हिंदुत्व, मराठी अस्मिता, संस्कार इत्यादी सर्वच बाबींमध्ये दक्षिण मुंबई, मुंबई, महाराष्ट्र व भारत अशा विविध पातळ्यांवर स्वत:चे कर्तव्य बजावणारे भाई ग्रामीण जनतेच्या, आदिवासी पाड्यांच्या संदर्भात देखील कायम जागृत असतात. कुंभवडे गाव येथील परिसरातील गावकर्यांना अनेक वर्षे भेडसावणारा पाण्याचा गहन प्रश्न त्यांनी सातत्याने सर्व स्तरांवर पाठपुरावा करून धरण बांधण्यास प्रशासकीय मंजुरी व आर्थिक तरतुद तीदेखील तब्बल 35 कोटीपेक्षा अधिक करुन त्यांनी कोकणातील जनतेसोबत देखील बांधिलकी राखली आहे. कुंभवडे येथील शंकर महादेव सावंत ग्रामविकास शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष पद भूषविताना खेड्यातील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे फलीत म्हणजे गत 10 पेक्षा अधिक वर्षे या शाळेचा माध्यमिक शालांत परीक्षेत सातत्याने 100टक्के निकाल! ‘आदिवासींसोबत दिवाळी’ सारखे 3 दशकांहुन अधिक काळ सातत्याने चालू असलेले उपक्रम भाईंच्यामधील माणुसकी दर्शवितात. गावे दत्तक घेऊन त्यांच्या सर्वांगीन उन्नतीसाठी अविरत प्रयत्न करणारे भाई त्यामुळेच समाजातील सर्वच घटकांना आपलेसे वाटतात. भाईंची सर्वसामान्यांच्या मनातील प्रतिमा ही लोकप्रतिनिधी किंवा राजकीय नेत्यापेक्षा अधिक एक कुटुंबवत्सल, कणखर, संरक्षक अशा कुटुंबप्रमुखाची आहे.
अरविंद सावंत देश पातळीवर महत्त्वाची पदे भुषवित असताना देखील त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वलय, त्यांचे राजकीय स्थान, त्यांचे व्यस्त दैंनंदिन कार्यक्रम हे जनता व त्यांच्यामधील अडसर कधीही ठरत नाहीत. सर्वसाधारणपणे अन्य कार्यालयांमध्ये आढळणारा ‘प्रोटोकॉल’ अर्थात खासदारांना भेटण्यासाठीच्या औपचारिकता, आधी ‘अपॉइन्टमेन्ट’ घेणे इत्यादी बाबींना भाईंनी जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे. अरविंद सावंत यांच्या दादर येथील मध्यवर्ती कार्यालयात ते उपलब्ध असल्यास कोणीही त्यांना जाऊन भेटुन स्वत:ची व्यथा मांडु शकतो, आपला संदेश थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवु शकतो. लोकांना भेटणे सोयीचे व्हावे या एका कारणास्तव भाई ‘दादर’ स्टेशनजवळील कार्यालयाचा उपयोग कामकाजासाठी करतात. बडेजाव, दिखाऊपणा, वलय इत्यादी जनतेच्या व नेत्याच्या मध्ये दुरावा निर्माण करु शकणार्या मापदंडांना ते कटाक्षाने टाळतात, त्यामुळे सुलभतेने जनतेस स्वत:च्या खासदारास कधीही भेटता येते.
२०१४ ते २०१९ या लोकसभेच्या कार्यकाळाच्या रिपोर्टनुसार लोकसभा सत्रात हजर राहण्यात, मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न विचारण्यात, लोकहिताच्या चर्चेत सहभागी होण्यात अख्ख्या देशात सर्वोच्च स्थानी असलेले अरविंद सावंत, ‘फेम इंडिया’ द्वारे 25 प्रवर्गांमध्ये सर्वश्रेष्ठ प्रतिभा दाखविणाऱ्या कर्मयोद्धा खासदारांची निवड करण्यासाठी केल्या गेलेल्या सर्वेक्षणात ‘जज्बा’ प्रवर्गात देशातील सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून निवडले गेलेले भाई, ‘मुंबै भूषण’ पुरस्काराचे सार्थ मानकरी भाई आजही सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्यातील एक असल्याप्रमाणे मिसळतात, त्यांच्या सुखात सहभागी होऊन सुख द्विगुणीत करतात आणि दु:ख वाटुन हलके करतात. व्यस्त वेळापत्रकांत देखील अरविद सावंत गणेशोत्सव, दहीहंडी, होळी, ईद आदि सर्व धर्मांच्या प्रमुख सणांना उपस्थिती आवर्जुन लावतात व आमंत्रकांच्या आनंदात देखील त्यांच्यातीलच एक असल्याप्रमाणे समरस होतात हे त्यांचे अजुन एक उल्लेखनीय वैशिष्ट्य!
३० मे २०१९ रोजी खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली, “मंत्रिपदाची शपथ घेतानाही वाटत होते शिवसेनाप्रमुख जवळ आहेत. त्यांनी मला ही संधी दिली आहे. आज साहेब हवे होते. डोके त्यांच्या पायावर ठेवले असते. पायावर डोके ठेवताना जी पाठीवर थाप मिळायची ती लढायची उर्जा देऊन जायची. असा निर्मोही नेता मी आजपर्यंत पाहिला नाही.” या शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचा अधिभार स्विकारल्यावर त्यांनी छोट्या कालावधीतच स्वत:च्या विकासाभिमुख कार्यशैलीने व अभ्यासपूर्ण निर्णयांनी स्वत:ची छाप उमटविली. धाडसी निर्णयांनी त्यांनी उद्यमांच्या अधिकारी वर्गामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला. पर्यावरण संरक्षणाची महत्त्वपूर्ण गरज ध्यानात घेवुन त्यांनी ईलेक्ट्रीक व्हेईकल्स व ईलेक्ट्रीक व्हेईकल्स चार्जींग स्टेशन्स काश्मीरपासुन सर्व राज्यांमध्ये, अवघ्या देशभरात उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली. आजारी उद्योगांना पुनर्जीवीकरणासाठी सशक्त उद्योगसमुहांनी पूढे यावे ह्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले.
परंतु ११ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी स्वाभिमान व पक्षनिष्ठेच्या मुल्यांना जागुन अचानक आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. “लोकसभा निवडणुकी आधी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावरील जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.” असे मनोगत त्यांनी राजीनाम्याच्या वेळी व्यक्त केले.
युनोच्या व्यासपीठावर देशाचे प्रभावी प्रतिनिधीत्व करणारे बुद्धिमान भाई, लोकसभेत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ चा नारा देणारे निडर भाई, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, उत्तरप्रदेश सारख्या राज्यात जाऊन शिवसेनेचा भगवा लोकांच्या मनात फडकवणारे भाई, सीमेवरील जवानांसोबत हिंदुस्थान – पाकिस्तान सीमेवर स्वत: जाऊन राहणारे भाई, मराठीस अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी संसदेसमोर बुलंद आवाज करणारे भाई, महानगर टेलिफोन निगम च्या समस्यांसाठी संसदेच्या आवारातच आंदोलन करणारे भाई, विविध दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्रामध्ये शिवसेनेची भूमिका सयुक्तिकपणे मांडताना अन्य लोकांची बोलती बंद करणारे भाई आणि यासोबतच दहीहंडीच्या उत्सवात बॅन्जो स्वत: वाजविणारे भाई, शाळेच्या कार्यक्रमात स्वत: फळ्यावर स्वागताचे सुविचार कॅलिग्राफी स्वरुपात चॉकने लिहिणारे भाई, क्रिकेट स्पर्धेस भेट दिल्यावर स्वत: बॅट हातात धरुन चौकार – षटकार मारणारे भाई, आजही कुठल्या कर्मचाऱ्याने बोलावल्यावर शक्य असल्यास अगदी घरगुती पूजेसही हजेरी लावणारे भाई, शिवसैनिकांच्या घरच्या दु:खात विव्हल होणारे भाई, कार्यालयात भेटायला आलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत संवाद साधणारे भाई सर्वार्थाने प्रत्येकाला आपले वाटतात आणि नकळतच ‘आपला माणूस’ ही बिरुदावली सार्थ ठरवतात!