जय महाराष्ट्र!
२०१९ आणि २०१४ ही माझ्या आजवरच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण वर्षे… सलग दोन लोकसभा निवडणूकीत खासदार म्हणून दक्षिण मुंबईकरांची, मुंबईची, महाराष्ट्राची, हिंदुस्थानची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. हे फलित होते वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाचे, शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाचे, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, माननीय भाजपा अध्यक्ष श्री. अमित शहा यांच्या सहकार्याचे, शिवसेना नेते – आमदार श्री. आदित्य ठाकरें सक्रीय सहभागाचे, रिपाई नेते श्री. रामदास आठवले यांच्या सहकार्याचे, महायुतीमधील सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांच्या मेहनतीचे, शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, स्थानिय लोकाधिकार समिती, शिवसेनेच्या अंगीकृत संघटना, महानगर टेलिफोन निगम कामगार संघ, महायुतीतील सर्व घटकपक्षांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अविश्रांत मेहनतीचे व प्रामुख्याने दक्षिण मुंबईमधील मतदारांच्या विश्वासाचे!
संसदेत शपथ घेतली व मराठी आवाज लोकसभेत दुमदुमला कारण शपथ मराठीत आणि शिवसेनाप्रमुखांना वंदन करुन घेतली ! !
त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे सातत्याने मार्गदर्शन करत, मनोधैर्य वाढवत होते. आपल्या सरकारला हक्काने सूचना करायला मी कमी पडलो नाही. लोकसभेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषयांपासून जनसामान्यांच्या हिताच्या सर्व विषयांवर बोलणारा मी पहिला खासदार! मग प्रश्न हिंदुस्थान – पाकिस्तान संबंधांचा असो, सीमेवरील जवानांचा असो, देशाच्या सुरक्षेचा असो, कश्मीरचा असो, राममंदीरचा असो, जीएसटीचा असो, उद्योजकांचा असो, गिरणी कामगारांचा असो, माझ्या चाळकर्यांचा असो, जुन्या इमारतींचा असो, शेतकर्यांचा असो, ज्येष्ठ नागरिकांचा असो, महिलांचा असो, बेरोजगारांचा असो, विद्यार्थ्यांचा असो, कोस्टल रोड, मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी निधी, क्लस्टर डेव्हलपमेंटचा असो, आपल्या राज्याचे, मराठी भाषेचे, मुंबईकरांचे संबंधित विषय मी प्रभावीपणे केंद्रात मांडत राहिलो. माझी लोकसभेतील भाषणे चलचित्रांकीत (व्हिडियो) स्वरुपात ऑनलाइन उपलब्ध आहेत. आपण सारेजण माझ्या संकेतस्थळावर / युट्युबवरील माझ्या चॅनलवर माझी भाषणे पाहु शकता. आपण केलेले मतदान सार्थकी लागल्याचा आनंद आपल्याला नक्की मिळेल.
दक्षिण मुंबई मतदारसंघ म्हणजे गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत अशा जनतेचा मतदारसंघ ! या सगळ्यांच्या संदर्भातील जे जे म्हणून प्रश्न केंद्रसरकारशी निगडीत आहेत त्या त्या प्रश्नांवर मी आवाज उठविला, दक्षिण मुंबईकरांसाठी महत्त्वपूर्ण केवळ मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला व हिंदुस्थानला भेडसावणाऱ्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण भाषणांनी लोकसभेत वाचा फोडुन ठसा उमटविता आला, देशपातळीवरील धोरणे, विधेयके, भूमिका यांवर चर्चेत सहभागी होताना सखोल अभ्यासपूर्ण भूमिकेतुन. लोकसभेत चर्चेसाठी येणाऱ्या बाबींवर योग्य त्या मुद्यांना पाठिंबा दर्शवितानाच सुधारणादेखील सुचविल्या याचे समाधान आहे. विविध केंद्रीय समित्यांमध्येदेखील केवळ हजेरी न लावता प्रत्येक प्रश्नावर परखड मत मांडले आहे, योग्य त्या सूचना केल्या आहेत व त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला आहे.
करी रोडचा पूल, पाईप लाईन गॅस सर्विस, मध्य व पश्चिम रेल्वेसंबंधिचे विविध प्रश्न, रेल्वेच्या प्रवाशांच्या सुखसोयींसाठी अनेक उपाय सुचवले व काहींची अंमलबजावणी देखील झाली याचा आनंद आहे. जे. जे. रुग्णालयास अत्याधुनिक कार्डिॲक रुग्णवाहिका, दिव्यांगांना तीन चाकी स्कूटर्स, रेल्वेस्थानकांवर आसनव्यवस्था, प्रियदर्शनी पार्क (नेपियन सी रोड) सुशोभीकरण, अनेक मैदाने सुशोभीकरण, आवश्यक ठिकाणी पंप रुम बसवुन दीर्घकाळ प्रलंबित पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आसनव्यवस्था, व्यायामशाळा, ज्येष्ठ नागरिक कट्टा, 24 तास पाणी सुविधा असणारी आधुनिक शौचालये, अनेक रस्त्यांचे डांबरीकरण, समाजमंदीरे आदी अनेक विकासकामे खासदार निधीतून करण्यात आली. दशकानुदशके प्रलंबित असणाऱ्या अनेक रेल्वे पुलांची पुनर्बांधणी करु शकलो याचा देखील आनंद आहे.
दक्षिण मुंबईचा कायापालट होत आहे. भारत आज निर्भयपणे आर्थिक, आधुनिक, जागतिक पातळीवर प्रभावशाली महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अनेक मापदंडांवर हिंदुस्थानने वेगळी उंची गाठली आहे. देश पातळीवर अनेक नवीन संकल्पना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. देशाच्या हातात हात मिळवुन महाराष्ट्र राज्य देखील शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करीत आहे.
शिवसेना राजकीय पक्ष असला तरी ८० टक्के समाजकारणावर आमचा भर आहे व त्यानुसार सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे.
भ्रष्टाचारमुक्त, सुनियोजित विकासासाठी कटीबद्ध, सामान्य जनतेसोबत बांधिलकी निभावण्यासाठी आपले आशीर्वाद असेच राहु द्या, ही प्रार्थना !
जय हिंद! जय महाराष्ट्र! वंदे मातरम्!