प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे अशी राजकीय परंपरा लाभलेल्या ठाकरे घराण्यात जन्म झालेल्या आदित्य ठाकरे यांना लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने १७ ऑक्टोबर २०१० रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर युवासेनेची स्थापना झाली आणि त्याचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर मुंबईत युवा सेनेचा झंझावात सुरू झाला.

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने महाराष्ट्राच्या राजकारणात क्रांतिकारक बदल घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून कार्य हाती घेतले आहे. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, तरुणांचे संघटन करून युवाशक्तीच्या ऊर्जेचा पुरेपूर वापर जनसेवेसाठी करावा हीच आदित्य ठाकरे यांची संकल्पना आहे. ‘शिक्षण, आरोग्य आणि रोजगार’ या तीन क्षेत्रांत कार्य करणाऱ्या युवासेनेचे अवघ्या काही वर्षभरातच व्यापक युवा चळवळीत रूपांतर झाले आहे. नव्या फळीचे नेतृत्व तयार करण्यासाठी झटणाऱ्या आदित्य ठाकरेंचे नेतृत्व असणारी युवासेना आता महाराष्ट्राबाहेरही आपले पंख पसरवू लागली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, जम्मू काश्मीरसारख्या राज्यांतही युवासेना पोहोचली आहे.

राजकीय पार्श्वभूमी असली तरी युवासेनेने राजकारणाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांतही दमदार पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. उद्योग क्षेत्र, समाजसेवा, कला, क्रीडा करमणूक क्षेत्रातील दिग्गजांना जोडण्याचे कामदेखील युवा सेनेने मोठ्या प्रमाणावर केले आहे. शिवेसेनेच्या धर्तीवरच राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देणे हेच युवासेनेचे उद्दिष्ट आहे. कोणतेही नेतृत्व न लादता प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये नवे, उदयोन्मुख नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न युवासेना करते आहे.

सर्वसामान्य नागरिक आणि तरुणाईच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी युवा सेनेने प्रसंगी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उग्र निदर्शने केली आणि केंद्रापासून राज्यापर्यंतच्या मंत्र्यांना शिष्टमंडळांसह भेटून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीवही करून दिली. तसेच अल्पकाळातच कधी आंदोलनांचे तडाखे, तर कधी शिष्टमंडळांसह भेटीगाठी घेऊन दिल्लीच्या तख्तापर्यंत युवासेनेने धडक दिली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सेनेटच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहिला दणका दिला. सेनेटच्या १० पैकी ८ जागांवर विजयश्री प्राप्त करून आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठावर भगवा झेंडा डौलाने फडकवला. सेनेट निवडणुकीच्या माध्यमातून विजयाच्या श्रीगणेशा करतानाच युवा सेनेने नवा इतिहासच रचला.

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या डब्याची मागणी केली. त्यानंतरच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी याविषयीची घोषणा केली होती. तसेच राज्यातील शिकाऊ डॉक्टरांचे विद्यावेतन रु. २५५० इतके अत्यल्प होते. या अन्यायाविरुद्ध त्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सर्व डॉक्टरांना जोरदार पाठिंबा दिला. यासाठी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन विद्यावेतन वाढविण्याची आग्रही मागणी केली. युवासेनेमुळे बाकीच्या पक्षांचे लक्ष पण या आंदोलनाकडे वळले.

विविध पातळीवर होणाऱ्या निवडणुकांप्रसंगी म्हणजेच लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका, महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजयासाठी तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तळमळीने काम करतात. याची प्रचीती लोकसभा निवडणुकीच्या वेळी आली. स्वतः आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या साथीने राज्यभरात दौरे करून शिवसेनेच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला.  विधानसभा निवडणुकीतही राज्यात शिवसेनेची सत्ता यावी, यासाठीही युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली. शिवसेना नेते – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवाशक्तीला चेतवले आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवकांची ही ऊर्जा भावी काळात आपल्या शक्तीचा जोश दाखवल्याशिवाय राहणार नाही.