१७ नोव्हेंबर, २०१२ रोजी दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांनी घड्याळाचे काटे थबकले आणि काळीज हेलावून सोडणारी एक दु:खद बातमी आली. नको नको म्हणताना कानाचे पडदे फाडून आत गेली. हृदयाचा ठोकाही चुकला. त्यादिवशी मुंबईत सागराच्या लाटा नि:शब्द झाल्या. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी निरव शांतता मुंबईत, महाराष्ट्रात पसरली. येत होता आवाज तो फक्त हुंदक्यांचा आणि वाहत होता पूर तो फक्त अश्रुंचा. एक सम्राट अंतर्धान पावला होता. ज्यांनी ४६ वर्षे या महाराष्ट्रात झंझावात केला. मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसांसाठी ज्यांनी वाणी, लेखणी आणि कुंचल्याने भल्याभल्यांना दरदरुन घाम फोडला. देव, देश आणि धर्म आणि तोही जानवे घालून देवळात घंटा बडविणाऱ्यांना नव्हे, तर आतंकवादीयांना, आक्रमकांना बुडविणारा राष्ट्रधर्म शिकविला, जागवला, जोपासना आणि त्यासाठी अखंडपणे तत्वाला मुरड न घालता संघर्ष केला. असा एक सम्राट, परंतु उपभोगशून्य सम्राट! ज्यांचे सिंहासन नव्हंत सोन्याचं, नव्हतं चांदीच, ते होतं मराठी माणसांच्या, हिंदुंच्या, राष्ट्रभक्त एतद्देशीय नागरीकांच्या हृदयाचं! आणि म्हणून ते होते हिन्दुहृदयसम्राट !! कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शून्यातून विश्व निर्माण करणारे महामानव ! ते आम्हांस सोडून गेले. एका ते:जपूंज शिवसूर्याचा अस्त जाहला होता. अथांग सागराला लाजवले अशी अंत्ययात्रेला अलोट गर्दी. ‘बाळासाहेब परत या’, ‘बाळासाहेब परत या’, ‘परत या’ असा हृदयद्रावक आलाप त्यांच्या अंत्ययात्रेत होत होता, हे अभूतपूर्व आहे, यातच त्यांचे सारे मोठेपण, ऋषीतुल्य व्यक्तिमत्व सामावलेले आहे. साहेबांवर निरतिशय प्रेम करणाऱ्या, विक्रमी गर्दीचा उच्चंक गाठणाऱ्या शोकमग्न जनतेच्या साक्षीने हा सम्राट १८ नोव्हेंबर, २०१२ रोजी अनंतात विलीन झाला.

शिवसेनाप्रमुख म्हणजेच वादळच! एका थोर व्यंगचित्रकाराने आपल्या कुंचल्याच्या एका फटकाऱ्यातून अनेक तीर वर्मी मारले. त्यातूनच एक लक्ष्य ठरले, मराठी माणसाचे, त्याच्या हिताचे, अस्मितेचे, संस्कृतीचे. ते साध्य करण्यासाठी शिवसेनेची निर्मिती झाली. आणि कालचे ‘व्यंगचित्रकार’ आणि ‘मार्मिक’ कार आता शिवसेनाप्रमुख झाले.

१९ जून १९६६ शिवसेनेचा स्थापना दिवस, आज तो शिवसैनिकांचा सण झालाय. या देशात अनेक पक्ष, संघटना निर्माण झाल्या पण त्या संघटनांचे वर्धापन दिन साजरा करण्याचा आणि तोही पक्षाच्या प्रमुखांच्या विचारांचे सोने लुटून करण्याचा पायंडा शिवसेनेने पाडला. दसऱ्याचा मेळावा म्हणजे शिवसैनिकांसाठी विजयोत्सवाची पर्वणी. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची धार, त्यादिवशी अशी काही तेजस्वी असते की गंज चढलेली शस्त्रेही मोहरून, शहारुन जातात आणि भल्याभल्यांना रक्तबंबाळ करुन जातात. सीमोल्लंघनाचा खरा अर्थ कुणि महाराष्ट्रात रुजवल असेल तर तो शिवसेनेने !

व्यंगचित्रकार, मार्मिकचे संपादक शिवसेनाप्रमुख झाले, काल लेखणी आणि कुंचल्याच्या फटकाऱ्याने भल्या भल्यांना घायळ करणारे शिवसेनाप्रमुख आता आपल्या वाणीने साऱ्या महाराष्ट्राला भारावून टाकू लागले. आज जरा काही खुट्ट झाले की साऱ्या मिडियावर बातम्या झळकतात, गल्लीतले एखादे छोटेसे आंदोलन भीम पराक्रम केल्यासारखे सातत्याने दाखविले जाते. तेव्हा एवढी माध्यमेही नव्हती आणि वर्तमानपत्रे, साप्ताहिकेही नव्हती. परंतु जी होती ती वाचली जायची. मार्मिक मधून सतत येणाऱ्या ‘वाचा आणि थंड बसा’ या सदराने, मराठी माणसाचे स्फुल्लिंग जागे केले. त्याला अस्मित्ची जाणीव करुन दिली. त्याच्या भाषा आणि संस्कृतीवरचा घाला त्याला जागृत करु लागला.

शिवसेनेच्या निर्मितीलाच शिवसेनाप्रमुखांनी पहिला विचार दिला “ब्राम्हण-ब्राम्हणेतर, मराठा-मराठेतर, श्याण्णव कुळी-ब्याण्णव कुळी, घाटी-कोकणी, दलित-दलितेतर, उच्च-नीच हे सारे भेद गाडून मराठी माणसा एक झालस तर आणी तरच तुला न्याय मिळेल !” हा विचार मराठी माणसाला, महाराष्ट्राला चेतना देऊन गेला. मुंबईतला मराठी माणूस एकवटला. मुंबईजवळचे शहर ठाणेही मोहरुन गेले. मग नाशिक आणि पुण्यातही शिवसेनेच्या शाखा सुरु झाल्या. या शाखा म्हणजे जनतेची न्याय मंदिरे झाली. घरातील भांडण ते इमारतीतील वा विविध संस्थामधील भांडणे सोडवण्याचे ते न्याय मंदीर झाले. शाळा प्रवेश, आरोग्य शिबिर, रक्तदान, इस्पितळातील पेशंटना मदत ही सारी समाज कार्ये सुरु झाली. त्यातूनच शिवसेनेची ‘रुग्णवाहीका’ सेवा सुरु झाली. ही सारे कामे सरकारची, पोलीसांची ही विचारधारा घेऊन आजवर गादीवर आडाला तंगड्या लावून बसलेल्या सत्ताधारी आणि तत्कालीन विरोधी पक्षातील, काही अपवाद वगळतास, राजकारण्यांना मोठा धक्का होता.

‘अर्हनिशं सेवामहे’, २४ तास सेवा हा आता शिवसैनिकांचा धर्म झाला. आज ज्या संघटना व पक्ष असे कार्यक्रम घेत आहेत त्याचा पाय ‘शिवसेनेचा’ हे कुणालाही नाकारता येणार नाही. सूर्यमंडळात अनेक ग्रह नक्षत्र सूर्याच्या तेजाने प्रकाशित होत असतात. तसा मराठी माणूस, हिंदू, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे या सूर्याच्या प्रकाशाने न्हाऊन निघाला, प्रेरित झाला.
४२ वर्षे एक व्यक्ती शिवभक्ती, राष्ट्रभक्तीचा तेजस्वी भगवा विचार, एकच मैदान (शिवतीर्थ) आणि एकच मार्गदर्शक असा विक्रम करणारे वंदनीय शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरेच! जगाच्या कानाकोपऱ्यात कुठल्याच राजकीय नेत्याला जनतेने इतका दिर्घकाळ आपल्या हृदयसिंहासनावर बसवून स्वीकारल्याचे इतिहासात दुसरे उदाहरण नाही. म्हणूनच शिवसेनाप्रमुख हे एकमेवाद्वितीय, राष्ट्रभक्तीने ओथंबलेले, तेजस्वी नेतृत्व. जे या देशाच्या एकतेचा, अखंडतेचा सातत्याने विचार करतेय. त्यासाठी प्रसंगी पक्षीय धोरण, राजकारण दूर ठेवण्याचे धारिष्ट्य दाखवतेय. मराठी माणसासाठी तीळ, तीळ तुटतय. धनदांडग्यांच्या आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या राजकारणात, ज्यांच्या कुटुंबाचा वा स्वत:चा राजकारणाशी काडीचा संबंध नाही, अशा सर्वसामान्यांना निवडणुकीत उमेदवारी देऊन निवडून आणण्याचा भीम पराक्रम जे सातत्याने करीत आहेत. ज्यांनी “जात नाही ती जात” असे म्हणत “पोटाला जात नसते” हा विचार निव्वळ दिला नाही तर आपल्या पक्षात रुजवला. असा अद्वितीय कार्याचा हिमालय उभा केला. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे उभे करताना सत्तेच्या कोणत्याही पदाला स्पर्श केला नाही असे दुर्मिळ नव्हे तर हिन्दुस्थानच्या राजकारणातील एकमेव निर्मोही नेतृत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख!
शंकरासारखा भोळा आणि प्रसंगी तिसरा डोळा म्हणजे शिवसेनाप्रमुख !! सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांची नाळ थेट शिवसैनिकांशी आणि जनतेशी जुळली होती. जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवांनो / भगिनींनो आणि मातांनो असे त्यांनी उच्चारल्यानंतर आसमंत दुमदुमुन जावे अश्या घोषणा आणि टाळ्यांचा कडकडाट होत असे. ही उर्जा आणि स्फुर्ती देणारे हे चैतन्यमयी नेते होते. दुमदुमुन जावे अशा घोषणा आणि टाळ्यांचा कडकडाट होत असे. ही उर्जा आणि स्फुर्ती देणारे हे चैतन्यमयी नेते होते. त्यांच्या वाक्यात ‘माझा शिवसैनिक’ किंवा ‘माझ्या शिवसैनिकांनो’ हे उद्गाोर त्यांची नाळ शिवसैनिकांशी कशी जुळली होती यांचे द्योतक आहे.

मागे मी मे महिन्यात स्लीप डिस्कच्या आजाराने खिळलो होतो. हे त्यांना एक दिड महिन्यानंतर कुठून तरी कळले होते. ताबडतोब त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले मला का नाही कळविले? तू आडवा आहेस? अरे आपल्याला शत्रुला आडवे करावयाचे आहे ! उभा रहा !! मी एका डॉक्टरला तुझ्यावर इलाज करण्यास सांगतो, तुला त्या डॉक्टरांचा फोन येईल. तुझा पत्ता त्यांना नीट दे. ते घरी येऊन तुझ्यावर उपचार करतील. त्यानंतर मला डॉक्टरांचा फोन आल. मी डॉक्टरांना माझ्या आजारपणाबद्दल सांगितले. त्यांनी माझ्यावर त्वरीत इलाज करतो म्हणून सांगितले. त्यानंतर १० मिनीटात साहेबांचा पुन्हा फोन आला. आणि विचारले तुला डॉक्टरांचा फोन आला का? मी हो म्हटले. तेव्हा ते म्हणाले ताबडतोब इलाज सुरू कर. मी भांबावून गेलो, मला काही सुचतच नव्हते. आमच्या दैवताचाच फोन यावा याने मी भांबावून गेलो होतो. हे भाग्य कुठल्या पक्षाच्या किंवा संघटनेच्या कार्यकर्त्याला लाभत असेल? एवढ्यावरच थांबतील तर साहेब कसले? साहेबांनी तीन दिवसांनंतर पुन्हा फोन केला आणि विचारले, काय रे, कसे वाटते? मी म्हटले साहेब खरेच बरे वाटत आहे. हे लिहिताना माझा कंठ दाटून आला आहे. डोळे अश्रूंनी डबडबलेले आहेत. स्वत:चे आजारपण विसरुन आपल्या सैनिकाची काळजी घेतली असे पितृवत प्रेम करणारे नेतृत्व उभ्या जगात कोठे सापडणार नाही.

माझ्या व्यक्तिगत जीवनात अश्या खुप आठवणी आहेत. साहेब, म्हणजे एक परीस. साहेबांचा स्पर्श म्हणजे परीसासारखा होता. ज्याला साहेबांचा स्पर्श होत असे त्याचे सोने होत असे, व्यक्तिगत नव्हे तर, तमाम शिवसैनिक, हिंदु, राष्ट्रभक्त यांच्यावर त्यांचे असेच अगाध प्रेम होते. अशीच प्रत्येक शिवसैनिकाची ते काळजी घेत असत. त्यांची कायमची एक सूचना असायची की, रात्री उशिरा गाडीने प्रवास करायचा नाही. वाटेत थांबा आणि उजाडल्यानंतर पुन्हा प्रवास करा.

मराठी भाषा, संस्कृती आणि जनतेवर त्यांचे अपार प्रेम होते. देशाच्या एकसंघतेसाठी त्यांनी हिंदुत्व स्विकारले. त्यावर त्यांची श्रद्धा आणि कडवट निष्ठा होती, म्हणूनच जेव्हा हा सूर्य १७ नोव्हेंबरला मावळला तेव्हा सागरही संकुचीत झाला. श्रद्धा आणि भक्तीने जमलेल्या अथांग सागराला आकाशाला गवसणी घालता येईना. गेल्या १०० वर्षात एवढी अलोट गर्दी आणि अलोट प्रेम सर्व जाती, धर्म, प्रांताच्या आणि पक्षाच्या पलिकडे मिळविलेले ते एकमेवाद्वितीय दैवत होते, आणि म्हणून ‘ऐसी श्रीमंती न देखीली या डोळा, पुण्याची गणना कोण करी’ भावपूर्ण साष्टांग नमस्कार!